वृत्तसंस्था/ व्हर्जिनिया
अमेरिकेच्या व्हजिर्निया येथील विद्यापीठात मंगळवारी संध्याकाळी पदवीदार समारंभादरम्यान गोळीबार झाला आहे. या गोळीबारात 2 जणांना जीव गमवावा लागला असून 5 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एकाचे वय 19 वर्षे इतके असल्याचे सांगण्यात आले. व्हर्जिनियाच्या रिचमंड भागातील मनरो पार्कमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.
गोळीबारापूर्वी पार्कसमोरील अल्ट्रिया थिएटरमध्ये पदवीदार सोहळा सुरू झाला होता. हे पार्क व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीच्या परिसरात आहे. गोळीबारात मारले गेलेले दोन्ही जण पदवीदार सोहळ्यात सामील होण्यासाठी आले होते. मृतांमध्ये 18 वर्षीय युवक अन् 35 वर्षीय इसमाचा समावेश आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर आणखी दोन स्कूल्समधील पदवीदान सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती रिचमंड पब्लिक स्कुलचे अधिकारी मॅथ्यू स्टेनली यांनी दिली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली आहे. यानंतर परिसरात आता कुठलाच धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मनरो पार्कमधील स्थितीवर पोलीस नजर ठेवून आहेत अशी माहिती रिचमंडचे महापौर लेवार एम स्टोनी यांनी दिली आहे.
अमेरिकेत चालू वर्षात 200 हून अधिक मास शूटिंगच्या घटना घडल्या आहेत. 2006 पासून आतापर्यंत अमेरिकेत सामूहिक हत्येचे 556 हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या घटनांमध्ये सुमारे 2,892 लोकांना जीव गमवावा लागला आहे. मागील 2 दशकांमध्ये दर 24 दिवसांनी अमेरिकेत सामूहिक हत्येची घटना घडत आहे.