प्रतिनिधी / वास्को
24 तासांच्या अखंड श्री दामोदर भजनी सप्ताहाची काल गुरूवारी दुपारी गोपाळकाल्याने उत्साहात सांगता झाली. दामबाबाच्या कृपाशिर्वादाने सप्ताह निर्विघ्नपणे पार पडला. राज्यातील तसेच शेजारील राज्यातील हजारो भाविकांनी ‘श्री दामोदराचे’ दर्शन घेतले. सप्ताहानिमित्त थाटण्यात आलेली फेरी वास्को शहरात पुढील पाच दिवस राहणार असून पावसाळी वातावरणातही फेरी गर्दी खेचू लागली आहे.
भजन सप्ताह परंपरेनुसार गुरूवारी दुपारी मंदिरातील श्रीफळाचे भजनी दिंडीसह वाजतगाजत खारवीवाडा येथील समुद्रात विसर्जन करण्यात आले. या दिंडीत युवा मंडळी मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती. श्रीफळ विसर्जनानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बाळगोपाळांचा गोपाळकाला मंदिरासमोरील मंडपात आला. गोपाळ काला…… गोड झाला… असे सुरात म्हणत फेर धरून नाचत आणि काकडीच्या फोडीचा प्रसाद झेलत त्यांचे मंदिरात आगमन झाले. पुन्हा काला खेळणाऱया गोविंदानी टाळ मृदंगाच्या तालावर मंदिरात फेर धरून बेभानपणे नाचून मंदिर परिसर दणाणून सोडला. यावेळी स्थानिक भजनी कलाकारांनी भैरवीचे सूर आळवून व नंतर आरती व सार्वजनिक गाऱहाणे होऊन या अखंड भजन सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.
चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहात अनेक भजनी मडळांनी सरस भजने सादर केली. चोवीस तासांत भाविकांनी हजारोंच्या संख्येने दामोदराचे दर्शन घेतले. यात राज्यातील मंत्री, आमदार व इतर नेते तसेच उद्योगपती, उद्योजक, वरीष्ठ शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सहभाग होता. बुधवारवारपासून काल गुरूवारी रात्रीपर्यंत देवदर्शनासाठी भाविकांची मोठय़ाप्रमाणात गर्दी होती. फेरीतही संध्याकाळी मोठी गर्दी उसळली होती. ही फेरी पुढील पाच दिवस मध्यरात्रीपर्यंत शहरात राहणार आहे. तेपर्यंत पोलीस सुरक्षा व्यवस्था व इतर व्यवस्था तैनात राहणार आहे. भाविकांनी गेल्या दोन दिवसात दाखवलेल्या सहकार्याबद्दल भजनी सप्ताह उत्सव समितीने समाधान व्यक्त केले आहे.