मंजुनाथ दुकळे नवीन अध्यक्ष : गोव्याबाहेरील महाजनांचा पूर्ण पाठिंबा
प्रतिनिधी /मडगांव
जांबावली येथील प्रसिद्ध श्री रामनाथ दामोदर देवस्थानाची नवीन कार्यकारिणी निवडून काढण्यासाठी झालेल्या निवडणुकीत या देवस्थानाचे माजी अध्यक्ष मंजुनाथ दुकळे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला. गोव्याबाहेरील महाजनांनी दुकळे यांच्या पॅनलला पूर्ण पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय नक्की झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वतः दुकळे यांनी संदेश हेगडे देसाई यांच्यावर 162 मतांनी विजय मिळविला.
गोव्याबाहेरील महाजनांना मतदानाचा अधिकार आहे की नाही या मुद्दावरून ही निवडणूक वादात सापडली होती. मतदान करणारा महाजन गोव्यात स्थाईक असणे आवश्यक असा मुद्दा पुढे करून गोव्याबाहेरील महाजनांना मतदान करण्याचा अधिकार नाकरल्यामुळे गोव्या बाहेरील 16 महाजन मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने सुरवातीला अंतरिम आदेश गोमंतकीय आणि बिगर गोमंतकीय या दोन्ही बाजूच्या महाजनांना वेगवेगळे मतदान करण्यास सांगून ही मते सील करून सांगे मामलेदार कार्यालयात ठेवण्यास सांगितले होते. मागच्या आठवडय़ात दिलेल्या अंतिम आदेशात गोव्याबाहेरील महाजनांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत सांगे ममलेदारांना मतमोजणी करण्याचा निर्देश दिला होता.
त्यानुसार सांगेचे मामलेदार राजेश साखळकर यांनी मतमोजणी केली. सुरवातीला गोव्यातील महाजनांची मते मोजणीसाठी घेतली असता दुकळे यांच्या पॅनलमधील अध्यक्षपदाचे उमेदवार मंजुनाथ दुकळे यांना फक्त 76 मते मिळाली. त्यांच्या गटातील खजिनदार गणाधिश कुंदे यांना 71, एटर्णी साईश हेगडे यांना 63 तर सचिव अमित हेगडे यांना 68 मते मिळाली उलट प्रतिस्पर्धी हेगडे देसाई यांच्या पॅनलच्या संदेश हेगडे देसाई यांना 201, जयेश कामत बांबोळकर यांना 205, प्रसाद घोडे यांना 215 तर आंनद कुंदे यांना 210 मते मिळाली.
मात्र गोव्याबाहेरील महाजनांची मते मोजण्यास सुरुवात केली असता परिस्थिती उलटी झाली दुकळे गटातील चारही उमेदवारांना 312, 321,ट311 व 312 अशी मते मिळाली. तर हेगडे देसाई गटातील उमेदवारांना 19, 11, 21 व 20 अशी मते मिळाली. उपसमिती निवडतानाही तसाच प्रकार घडला.
मामलेदार साखळकर यांनी निकाल वाचला त्यात अध्यक्षपदासाठी मंजुनाथ दुकळे यांनी संदेश हेगडे देसाई यांच्यावर 162, खजिनदारपदासाठी गणाधिश कुंदे यांनी जयेश कामत बांबोळकर यांच्याबर 176, एटर्णीपदासाठी साईश हेगडे यांनी प्रसाद घोडे यांच्यावर 138 तर सचिवपदाच्या निवडणुकीत अमित हेगडे यांनी आनंद कुंदे यांच्यावर 150 मतांनी विजय मिळविला.
उपसमिती निवडणुकीत अध्यक्ष, खजिनदार, एटर्णी व सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत दुकळे गटातील अमय भोबे यांनी उदय घोडे यांच्यावर 160, प्रताप खोपे यांनी गजानन दुकळे यांच्यावर 152, अतिष दुकळे यांनी प्रताप कामत बांबोळकर यांच्यावर 146 तर गजानन कुंदे यांनी अशोक भोबे यांच्यावर 160 मतांनी विजय मिळविला.