वृत्तसंस्था/ कौलालंपूर
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स सुपर-500 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आतापर्यंत दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणारी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच चीन तैपेईच्या ताय झु यिंगने संपुष्टात आणले.
शुक्रवारी या स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीन तैपेईच्या ताय झु यिंगने भारताच्या सातव्या मानांकित पी. व्ही. सिंधूचा 21-13, 12-21, 21-12 अशा गेम्समध्ये 55 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूचा हा द्वितीय मानांकित ताय झु यिंगकडून झालेला हा आठवा पराभव आहे. 2019 च्या बेसिल येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने यिंगचा पराभव करून सुवर्णपदक मिळविले होते. पुरुष एकेरीत आता भारताचा एच. एस. प्रणॉय आणि जपानचा सुनेयामा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे.