महाराष्ट्रातले राज्यसभा सदस्य आणि उद्धव ठाकरे यांच्या नियोजित पक्षाचे नेते संजय राऊत हे बिनधास्त आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. बुधवारी प्रसार माध्यमांसमोर बोलताना त्यांनी शिवसेनेला उद्देशून, हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, अशी जी वादग्रस्त टीका टिप्पणी केली, त्यामुळे ना केवळ महाराष्ट्र हादरले, जवळपास निम्मा देश हादरला. कोणतेही वक्तव्य करताना कोणाचाही विचार वा मुलाहिजा न राखणे, हे संजय राऊत यांचे वैशिष्ट्या. मुळात मूळ शिवसेनेच्या नेत्यांची ती खासियतच होती. नारायण राणे हे एक तसेच वादग्रस्त नेते आहेत, ज्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला, काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला परंतु शिवसेनेने त्यांच्यावर केलेले त्या काळातील संस्कार नारायण राणे हे तरी कुठे विसरले आहेत? आजही ते संजय राऊत यांच्याप्रमाणेच अनेक वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात. या दोन नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी अनेक मराठी वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढतो आहे. त्यामुळे वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीदेखील या अशा नेत्यांना काय वाट्टेल ते प्रश्न विचारून नेत्यांना भंडावून सोडतात आणि मग ही नेते मंडळी वादग्रस्त वक्तव्ये करून खळबळ माजवून देत असतात. संजय राऊत हे तर मुळातच एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. भाजप-शिवसेना युती तुटण्यासाठी खरेतर राऊत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक वादग्रस्त विधानांनी संजय राऊत हे गेली पाच वर्षे भाजपवर तुटून पडत आहेत. एवढी वर्षे भाजपवाले त्यांच्या विधानांना काडीचीही किंमत देत नव्हते परंतु अलीकडे संजय राऊत यांच्या विधानांबरोबरच त्यांचा तोलही जात असल्याचे दिसून येते. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जिवंत ठेवणे, हे या पक्षाबरोबरच संजय राऊत यांच्यासमोर देखील फार मोठे आव्हान आहे. संजय राऊत हे स्वत: धूर्त राजकारणी आहेत. मागील म्हणजेच इ.स. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नाईलाजाने शिवसेनेने भाजपबरोबर युती केली मात्र मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच हवे, हा हट्ट धरून बसणारे संजय राऊत यांनी निवडणुका झाल्या व निकाल जाहीर झाल्यानंतर कावेबाजपणे भाजपला धडा शिकवित भाजपला पाठिंबा देण्यास नकार दर्शविला व नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यातून भाजप व शिवसेना यांच्यात तीव्र संघर्ष झाले होते. प्रत्येकवेळी वादग्रस्त विधाने करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचीही पर्वा संजय राऊत यांनी केली नाही. वादग्रस्त विधानांनीच ते टार्गेट झाले आणि नंतर एका जमीन घोटाळ्यात त्यांना अटक होऊन काही महिने ते कोठडीची हवा खाऊन आले. त्यानंतरची हळूहळू राऊत यांची गाडी मूळ पदावर आली व वारंवार वादग्रस्त विधाने करू लागले. बुधवारी महाराष्ट्रात विधानसभा अधिवेशन चालू असतानाच पत्रकारांशी कुठेतरी बोलताना संजय राऊत यांनी विधीमंडळ नव्हे तर चोरमंडळ अशा पद्धतीची जहरी टीका केली. अशी वादग्रस्त विधाने करताना संजय राऊत यांनी आपण कोणालाही घाबरत नाही, असेही म्हटलेले होते. त्यांच्या या विधानावरून महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ माजला नाही तरच नवल. सत्ताधारी शिवसेना-भाजप सरकारने कडक शब्दात संजय राऊत यांच्यावर टीका तर केलेली होतीच शिवाय भाजपने त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे. सभापती नार्वेकर यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सभागृहाची चौकशी समिती स्थापन केली. या समितीच्या अहवालानंतर जी काही शिफारस समिती करील, त्या आधारे सभापती नार्वेकर महाराष्ट्र विधीमंडळात 8 मार्च रोजी आपला निर्णय जाहीर करतील. विधीमंडळाचे नियम व अटी संजय राऊत यांना नवीन नाहीत. ते राज्यसभेचे सदस्यही आहेत. त्यांना संसदीय नियम माहीत आहेत. अत्यंत जबाबदार अशी मंडळी अत्यंत बेजबाबदार विधाने करतात, त्यावेळी आश्चर्यच वाटते. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप सरकार सत्तेवर आहे. संजय राऊत यांनी आजवर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सर्व नेत्यांवर वैयक्तिक पातळीवरदेखील हीन शब्दप्रयोगाने टीका केलेली होती. त्यामुळेच अनेकजण दुखावलेली नेतेमंडळी हाती आयतीच आलेली शिकार थोडीच सोडणार आहे? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात गंभीर पद्धतीची टीका करणारी वक्तव्ये केली होती आणि त्यानंतर लागलीच संजय राऊत यांनी शिवसेनेच्या विधीमंडळाला चोरमंडळ, असे संबोधले आहे. यातून त्यांनी अकारण आपल्या अंगावर चिखल उसळवून घेतलेला आहे. आता राऊत यांची शेंडी विधीमंडळाचे प्रमुख सभापती नार्वेकर यांच्या हाती आहे. जर राऊत यांच्यावर विधीमंडळात भाजप व शिवसेना आमदारांनी केलेले आरोप खरे ठरले आणि सभागृह चौकशी समितीच्या अहवालात काही तथ्य आढळले तर संजय राऊत हे दोषी ठरतील व त्यांच्या डोक्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार राहील. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील याच पठडीतील नेते आहेत. ते उद्धव ठाकरे मंत्रीमंडळात मंत्री असताना मराठा समाजाविरोधात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या घरावर मराठा समाजाने मोर्चा काढला होता. कित्येक दिवस त्यांना पोलीस संरक्षणात फिरावे लागले होते. अलीकडे देखील छत्रपती शिवरायांबद्दल देखील त्यांनी अशाच प्रकारची वादग्रस्त विधाने केली होती. बुधवारी कर्नाटकातील भाजपच्या एका आमदाराने कोणत्याही प्रकारे मुस्लिम उमेदवारांना मतदान करू नका, अशा पद्धतीचे आवाहन करून त्यांनी भाजपलाच दोन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आणलेले आहे. प्रत्येक राजकीय पक्षात असे संजय राऊत असतातच व आहेत.नेते कोणीही असोत कायदे-कानून हे सर्वांना समान आहेत. लोकशाहीमध्ये सर्वांनाच आपले विचार व्यक्त करण्याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहेच परंतु याचा अर्थ कोणीही काय वाट्टेल ते भाष्य करू शकणार नाही. सध्यातरी संजय राऊत यांची परिस्थिती ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झालेली आहे.
Previous Articleसातारा पोलीस निरीक्षकांची कन्या अनुष्का राज्यात प्रथम
Next Article ग्रीसमध्ये दोन रेल्वेगाडय़ांची टक्कर, 32 बळी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment