शाहुवाडी प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील माण पैकी पातवडे गावच्या हद्दीतील गट नंबर 207′ 254 मधील 6 एकर 9 गुंठे क्षेत्रातील औषधी झाडे व अन्य झाडे आणि शेती उपयुक्त साहित्य असे अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत जळून खाक झाले. यात सुमारे 6 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार मालक दिलीप जगन्नाथ कार्वेकर राहणार मलकापूर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे. या घटनेचा महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप कार्वेकर यांच्या मालकीच्या पातौवडे गावच्या हद्दीतील जमिनीमध्ये औषधी वनस्पतीसह इतर झाडांची लागवड केली होती. या ठिकाणी अचानक लागलेल्या आगीत मोहगणीची 433 झाडे, अगरवूडची 74 झाडे, दालचिनीची 103 झाडे, आंबा 5, चिकू 5, मसाला झाडे 3, गवती चहाची सोळा हजार रोपे, चिंच 4, कढीपत्ता 3, मिरी 44 झाडे तसेच बांबूची बेटे, त्यासोबतच ठिबकसाठी असणारा ठिबक संच, मोठा सहा इंच पाईप दोन इंच पीव्हीसी पाईप ‘व पाच हॉल असे सर्व साहित्य मिळून व औषधी वनस्पतींची किंमत ही सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले.
य़ाबाबत दिलीप कार्वेकर यांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे तसेच तहसीलदार शाहूवाडी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या आगीच्या घटनास्थळी तलाठी प्रसाद मोहिते व कोतवाल कुमार पाटील यांनी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. अत्यंत कष्टाने पिकवलेल्या या शेतीतील झाडांचे आगीत नुकसान झाल्याने याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील यावेळी दिलीप कार्वेकर यांनी केली आहे .