वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकन संघासाठी प्रशिक्षक वर्गामध्ये माजी कसोटी आणि वनडे क्रिकेटपटू नावीद नवाझ तसेच चमिंडा वास यांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा रविवारी क्रिकेट लंकेने केली.
लंकेचे माजी क्रिकेटपटू नावीद नवाझ यापूर्वी बांगलादेशच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. 2020 साली झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघाला त्यांचे मार्गदर्शन लाभले होते. लंकन क्रिकेट मंडळाने आता नावीद नवाझ यांच्याशी दोन वर्षांचा करार केला असून त्यांच्यावर आता सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहील. त्याचप्रमाणे लंकन संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी अलिकडेच ख्रिस सिल्व्हरवूडची नियुक्ती करण्यात आली होती. लंकेचा संघ आता बांगलादेशच्या दौऱयावर जाणार असून या संघाला सिल्व्हरवूड आणि नावीद नवाझ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचप्रमाणे लंकेचा माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वासची वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी.विजेतुंगे हे लंकन संघाचे फिरकी गोलंदाज प्रशिक्षक तर मनोज अभयविक्रमा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून राहतील. लंकेचा संघ आपल्या आगामी बांगलादेश दौऱयात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.