वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ग्रीकच्या विद्यमान विजेत्या स्टिफानोस सित्सिपसने जर्मनीच्या ऍलेक्झांडेर व्हेरेव्हचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे फोकिनाने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा पराभव करत या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात सित्सिपसने व्हेरेव्हचा 6-4, 6-2 असा पराभव केला. व्हेरेव्हने तत्पूर्वी अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. तसेच ऑलिंपिक विजेत्या व्हेरेव्हने तब्बल तीन तास चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या सिनेरचा पराभव केला होता. या स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात फोकिनाने डिमिट्रोव्हचा 6-4, 6-7 (2-7), 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. स्पेनच्या 22 वर्षीय फोकिनाने हा सामना 75 मिनिटात जिंकला. या स्पर्धेत गेल्या मंगळवारी फोकिनाने सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता.