भारतासह साऱया विश्वात वृद्धांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाच्या आर्युमानात गेल्या 100 वर्षात जवळपास सरासरी 20 वर्षांची वाढ झालेली आहे. त्यामुळे पंच्याहत्तरी पार केलेले वृद्ध मोठय़ा संख्येने असतात. या वयात त्यांना घराबाहेर पडून पोटापाण्यासाठी काम करणे जमत नाही. मात्र जगण्यासाठी त्यांना आधार शोधावाच लागतो.
वृद्धवयात स्नायू आणि हाडांची शक्ती कमी झाल्याने माणसाला चालणे किंवा इतर हालचालींसाठी आधाराची तसेच बाहय़ साधनांची आवश्यकता भासते. कित्येकदा केवळ काठीने काम भागत नाही. वृद्धांची संख्या वाढण्याबरोबरच तरुणांचा आधार नसलेल्या आणि एकटे राहणाऱया वृद्धांची संख्याही वाढलेली आहे. अशा वृद्धांना चालणे व इतर हालचालींसाठी सहजगत्या उपयोगात आणण्यासारखी स्मार्ट स्टीक बनविण्याचा प्रकल्प कानपूर येथील आयआयटीच्या संशोधकांनी हाती घेतला आहे. ही स्टीक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बनविण्यात येत आहे. ही स्टीक साधारणतः दीड किलो वजनाची असून अवजड नसल्यामुळे वृद्धांसाठी सोयीची आहे. या काठीवर बसण्यासाठी आसनाचीही सोय आहे. चालताना वाटेत विश्रांती घ्यावीशी वाटल्यास तशी जागा उपलब्ध नसल्यास या काठीवर बसता येते. वृद्धांच्या शक्तीचे आकलन करून त्यानुसार त्यांना बळ पुरविण्याची क्षमता या स्मार्ट स्टीकमध्ये आहे. त्यात सेन्सर बसविला असून तो वृद्धाशी सातत्याने संपर्कात राहतो आणि वृद्धाच्या आवश्यकतेनुसार त्याला सेवा पुरवितो. ही स्मार्ट स्टीक वृद्धांच्या स्वास्थ्यासाठी एक क्रांतीकारक साधन ठरेल, असे दिसून येते.