संघटनेच्या बैठकीत मागणी : समस्या सोडविण्याचे जिल्हाधिकाऱयांचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
मॅन्युअल स्कॅव्हेंजर अंतर्गत सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या 389 सदस्यांना अद्यापही ओळखपत्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. स्वच्छता कर्मचाऱयांच्या सदस्यांना तातडीने ओळखपत्र देण्यात यावे असा मुद्दा स्वच्छता कर्मचारी संघटनेच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. येत्या दहा दिवसात या समस्येचे निवारण करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले.
स्वच्छता कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध समस्या मांडण्यात आल्या. मुख्यतः स्वच्छता कामगारांच्या पी. के. क्वॉटर्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
253 स्वच्छता कामगारांना कायमस्वरूपी घरे देण्याच्या मागणीचा मुद्दा अद्याप निकालात काढण्यात आला नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची विनंती करण्यात आली. कायमस्वरूपी सेवेत असलेल्या स्वच्छता कामगारांना 25 लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे. तसेच रमाबाई सभागृहात ग्रंथालय आणि व्यायामशाळा सुरू करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची विनंती करण्यात आली. निवृत्त स्वच्छता कामगारांकडून घरभाडे वसूल करण्यात आले आहे ते परत देण्यात यावे, अशा विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक दीपक वाघेला, सचिव विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.