प्रतिनिधी/ पणजी
अभिनेत्री तथा हरियाणा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांचे गोवा भेटीवर आल्या असता काल मंगळवारी पहाटे निधन झाले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस इस्पितळात दाखल झाले. प्रथम दर्शनी पाहता हृदय विकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची नोंद करून मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणाची उच्च स्तरावरून चौकशी केली जात असून डॉक्टरांचे विशेष पथक शवचिकित्सा करीत आहे. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जात आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
आपल्या काही सहकाऱयांसह गोवा भेटीवर आलेल्या सोनाली फोगाट यांचे हणजूण येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्य होते. मंगळवारी पहाटे त्या हॉटेलच्या खोलीत बेशुध्दावस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत जाहीर केले. त्या 24 ऑगस्टपर्यंत गोव्यात राहणार होत्या.
रात्री सहभागी झाल्या होत्या पार्टीत
सोमवारी रात्री हणजूण येथील एका पार्टीत त्या सहभागी झाल्या होत्या. नंतर त्या हॉटेलात परतल्या तेव्हा काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागेले होते. त्यामुळे त्यांना खाजगी इस्पितळात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषीत केले.
भाजपच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच हरियाणा आदिवासी मोर्चाच्या अध्यक्ष होत्या. 2019 साली हरियाणा विधानसभेच्या आदमपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.