प्राप्तिकर विभागाशी संबंधित प्रकरण :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांच्या कन्या प्रियांका वड्रा यांनी प्राप्तिकर विभागाशी निगडित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2018-19 च्या प्राप्तिकर असेसमेंटला प्राप्तिकर विभागाच्या केंद्रीय सर्कलमध्ये वर्ग करण्याच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिले आहे. 2018-19 चे असेसमेंट शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारीशी निगडित आहे.
संजय भंडारी हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भारताकरता वाँटेड आहे. संजय भंडारी हा प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. परंतु रॉबर्ट वड्रा यांनी आरोपीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा केला आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी आणि प्रियांका वड्रा यांची याचिका फेटाळली होती.
प्राप्तिकर विभागाने नियमांनुसारच निर्णय घेतला असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. संजय भंडारी समुहाच्या प्रकरणांशी कुठलेच देणेघेणे नसल्याचा युक्तिवाद करत गांधी कुटुंबाने संबंधित प्रकरण सेंट्रल सर्कलमध्ये वर्ग करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता.