काँगेसचे निषेधार्थ आंदोलन, राहुल गांधी ताब्यात
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशलन हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी मंगळवारी काँगेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची पुन्हा ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी ईडीच्या मुख्यालयात साधारणतः साडेसहा तास चालली. त्यांना आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी टाळल्याचे अनधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले असून त्यामुळे त्यांची चौकशी लांबत चालल्याचे स्पष्ट होत आहे. याच प्रकरणात राहुल गांधींचीही चौकशी होत आहे.
सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी हा लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोप काँगेसने केला. या चौकशीच्या निषेधार्थ काँगेसच्या बहुतेक सर्व खासदारांनी निदर्शने केली. दिल्लीतील निदर्शनांचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले.
अनेकांना अटक
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँगेस खासदार आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीतील गांधी पुतळय़ापासून मोर्चा काढला होता. हा मोर्चा विजय चौकाजवळ आल्यानंतर आडविण्यात आला. संसदपरिसरापर्यंत जाण्याची काँगेसची तयारी होती. तथापि, विजय चौकनजीकच बऱयाच कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये राहुल गांधींचाही समावेश होता.
पोलिसांशी हुज्जत
ताब्यात घेण्यापूर्वी राहुल गांधी यांनी साधारणतः अर्धा तास पोलिसांशी हुज्जत घातल्याचे दिसून आले. त्यांच्यात नेमक्या कोणत्या विषयावर आणि कोणत्या कारणांसाठी शब्दाशब्दी झाली याची माहिती मिळू शकली नाही. तथापि, नंतर गांधीना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शांतता प्रस्थापित झाली होती.
अनेक मार्ग बंद
काँगेसच्या मोर्चामुळे दिल्लीतील अनेक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे काही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. मोर्चा आडविल्यानंतर रस्ते मोकळे करण्यात आले. पोलिसांनी वाहनचालकांना दिशानिर्देश लागू केले होते. काँगेसने राजघाटावर निदर्शने करण्याची अनुमती मागितली होती. तथापि, ती नाकारण्यात आली. तरीही काही कार्यकर्त्यांनी राजघाटाकडे जाण्याचा प्रयत्न केला. राजघाट परिसरात जमावबदी लागू करण्यात आली होती.