दिल्लीतील पोलीस स्थानकात एफआयआर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय पटलावरही खळबळ निर्माण झाली आहे. दिल्लीतील उत्तमनगर पोलीस ठाण्यात एका महिलेने सोनियांचे स्वीय सचिव पी. पी. माधवन यांच्यावर नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. 26 जून रोजी दिल्लीच्या उत्तमनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तथापि, आपण महिलेला ओळखत असलो तरी तिने केलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण माधवनने दिले आहे.
आपला पती काँग्रेस कार्यालयात होर्डिंग्ज लावायचा. दोन वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काम मिळविण्याच्या उद्देशाने आपण पी. पी. माधवन याच्याशी संपर्क साधला. यादरम्यान माधवन याच्याशी काहीवेळा चर्चा झाल्यानंतर 21 जानेवारी 2022 रोजी माधवनने महिलेला पहिल्यांदा आपल्या घरी बोलावले होते. त्यानंतर आपण पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचे सांगत माधवनने आपल्यावर बळजबरी केल्याने सदर महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरून माधवनविरुद्ध कलम 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.