डिकॉक, व्हॅन डेर ड्युसेन, ‘सामनावीर’ माक्रेम यांची दमदार शतके
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने लंकेचा 102 धावांनी दणदणीत पराभव करुन विजयी सलामी दिली. 54 चेंडूत शतक झळकाविणाऱ्या अॅडेन माक्रेमला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
लंकन गोलंदाजीची धुलाई करताना 50 षटकात 5 बाद 428 धावा झोडपल्या. दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी शतके झळकाविली. प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेचा डाव 44.5 षटकात 326 धावात आटोपला. या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. डावातील दुसऱ्या षटकातच लंकेच्या मदुशंकाने कर्णधार बहुमाला 8 धावावर पायचीत केले. त्यानंतर मात्र लंकन गोलंदाजांची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. व्हॅन डेर ड्युसेन आणि डी कॉक यांनी दुसऱ्या गड्यासाठी 29 षटकात 214 धावांची द्विशतकी भागिदारी केली. डी कॉकने 84 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 100 धावा झळकाविल्या तर व्हॅन डेर ड्युसेनने 110 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह 108 धावा केल्या. 31 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेची ही जोडी फोडण्यात यश मिळाले. पथिरनाने डी कॉकला पायचीत केले. तो बाद झाल्यानंतर व्हॅन डेर ड्युसेनने माक्रेम समवेत तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली. वेलालगेने ड्युसेनला झेलबाद केले. माक्रेमने तुफान फटकेबाजी करताना केवळ 54 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 106 धावा जळकाविल्या. माक्रेमने क्लासेन समवेत चौथ्या गड्यासाठी 78 धावांची भर घातली. लंकेच्या रजिथाने क्लासेनला झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 32 धावा जमविल्या. माक्रेमने मिलर समवेत पाचव्या गड्यासाठी 41 धावांची भागिदारी केली. मदुशंकाने माक्रेमला झेलबाद केले. मिलरने 21 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 39 तर जेनसनने 7 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 12 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 14 षटकार आणि 45 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे मदुशंकाने 2 तर रजिता, पथिरना आणि वेलालगेने प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेचे शतक 105 चेंडूत, द्विशतक 176 चेंडूत, त्रिशतक 244 चेंडूत तर 400 धावा 290 चेंडूत फलकावर लागल्या. माक्रेमने अर्धशतक 34 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने तर शतक 49 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने झळकाविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात कुशल मेंडीसने तुफान फटकेबाजी करत 42 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 76 धावा झोडपल्या. असालेंकाने 65 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह 79 तर कर्णधार शनाकाने 62 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 68, रजिथाने 31 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 33, समरविक्रमाने 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 17 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे कोझीने 3 तर जेनसन, रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 त्याचप्रमाणे एन्गीडीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 50 षटकात 5 बाद 428 (डी कॉक 84 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 100, बहुमा 8, व्हॅन डेर ड्युसेन 110 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह 108, माक्रेम 54 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 106, क्लासेन 20 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 32, मिलर 21 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 39, जेनसन 7 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 12, अवांतर 23, मदुशंका 2-86, रजिथा, पथिरना, वेलालगे प्रत्येकी 1 बळी), लंका 44.5 षटकात सर्वबाद 326 (कुशल मेंडीस 76, आसालेंका 79, शनाका 68, रजिथा 33, समरविक्रमा 23, डिसिल्वा 11, अवांतर 20, कोझी 3-68, जेनसेन 2-92, रबाडा 2-50, केशवमहाराज 2-62, एन्गीडी 1-49).