12 कामगार मृत्युमुखी : ट्रकमधून फटाके अनलोड करताना दुर्घटना : मृतांचा आकडा वाढण्याची भीती
प्रतिनिधी/ बेंगळूर
फटाक्याच्या दुकानात आग लागून झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूर शहर जिल्ह्याच्या आनेकल तालुक्यातील अत्तीबेले येथे शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. रात्री 9 पर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू होते. आतापर्यंत 12 मृतदेह हाती लागले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते.
कर्नाटक-तामिळनाडू हद्दीवरील अत्तीबेले येथे नवीन यांच्या मालकीचे ‘बालाजी क्रॅकर्स’ नावाने फटक्यांचे मोठे दुकान आहे. दिवाळीनिमित्त येथे फटाके साठविण्यात येत होते. शनिवारी दुपारपासून येथे ट्रकमधून आणलेले फटाके अनलोड करण्यात येत होते. यावेळी फटाक्यांनी अचानक पेट घेतला. फटाके ट्रकमधून अनलोड करत असताना दुकान व गोदामात 20 कामगार होते. त्यापैकी चौघेजण स्वत:चा बचाव करून घेण्यात यशस्वी ठरले. तर उर्वरित कामगार अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत 12 कामगारांचे मृतदेह हाती लागले. त्यापैकी कोणाचीही ओळख अद्याप पटलेली नाही. तर 3 जखमींना तातडीने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
फटाक्यांचा स्फोट झाल्याने आजुबाजूची तीन-चार दुकानानेही जळून खाक झाली. दुकानासमोर थांबविण्यात आलेल्या तीन दुचाकी, टँकरही बेचिराख झाला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. दुकानाला एकच प्रवेशद्वार असल्याने तसेच आग अधिक व्यापल्याने गोदामातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. परिणामी त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
वाहतूक कोंडीत अडकला अग्नीशमन बंब
बेंगळूर-होसूर आंतरराज्य मार्गावर ही दुर्घटना घडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. खबरदारी म्हणून काही काळ वाहतूक रोखण्यात आली. या वाहतूक कोंडीत अग्नीशामक बंबही अडकून पडला. पोलिसांनी कोंडी दूर करून बंब दुर्घटनास्थळी पोहोचविण्यास अनुकूल करून दिले. घटनास्थळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, बेंगळूर ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख मल्लिकार्जुन बालदंडी, तहसीलदार शिवप्पा लमाणी, जिल्हा अग्निशामक दलाचे अधिकारी नागेश यांनी भेट देऊन माहिती घेतली.