वृत्तसंस्था/ केबेरा (दक्षिण आफ्रिका)
यजमान दक्षिण आफ्रिकेने सोमवारी येथे खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा 332 धावांनी दणदणीत पराभव करत दुसरी कसोटी एकतर्फी जिंकली. आयसीसीच्या कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत दोन सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 2-0 असा ‘व्हाईटवॉश’ केला. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजची ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 453 धावा जमविल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 217 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने 236 धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर त्यांनी आपला दुसरा डाव 6 बाद 176 धावांवर घोषित करून बांगलादेशला निर्णायक विजयासाठी 413 धावांचे कठीण आव्हान दिले. बांगलादेशने 3 बाद 27 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि तासाभराच्या कालावधीत त्यांचे उर्वरित सात फलंदाज 53 धावांत तंबूत परतले. बांगलादेशच्या दुसऱया डावात लिटॉन दासने 33 चेंडूत 5 चौकारांसह 27, मेहदी हसन मिराजने 25 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकारांसह 20 आणि तमीम इक्बालने 22 चेंडूत दोन चौकारांसह 13 धावा जमविल्या. 23.3 षटकात बांगलादेशचा दुसरा डाव 80 धावांत आटोपला. बांगलादेशच्या दुसऱया डावात केशव महाराज आणि हार्मर या फिरकी गोलंदाजांनी गोलंदाजी केली. केशव महाराजने 40 धावांत 7 तर हार्मरने 34 धावांत 3 गडी बाद केले. बांगलादेशचे शेवटचे तीन फलंदाज 7 चेंडूत बाद झाले.
इर्वी, मुल्डेरवर कोरोनामुळे निर्बंध
दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीतील रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी दक्षिण आफ्रिका संघातील सलामीचा फलंदाज इर्वी आणि अष्टपैलू मुल्डेर यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना खेळाच्या चौथ्या दिवशी मैदानात उतरण्यास निर्बंध घालण्यात आले. दरम्यान इर्वीच्या जागी झोंडो आणि मुल्डेरच्या जागी स्टुरमन या राखीव खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले होते.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव- सर्वबाद 453, बांगलादेश प.डाव सर्वबाद 217, दक्षिण आफ्रिका दु. डाव 6 बाद 176 डाव घोषित, बांगलादेश दु.डाव 23.3 षटकांत सर्वबाद 80 (लिटॉन दास 27, मेहदी हसन मिराज 20, तमीम इक्बाल 13, केशव महाराज 7-40, हार्मर 3-34).