नेदरलँड्सकडून धक्कादायक पराभव झाल्याने आव्हान समाप्त, ऍकरमन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ ऍडलेड
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारचा सुपर 12 फेरीतील पहिला सामना सर्वात धक्कादायक निकाल देणारा ठरल. गट 2 मधील झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने बलाढय़ दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी अनपेक्षित पराभव केला. या पराभवामुळे द.आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेने ‘चोकर्स’ची परंपरा पुढे चालू ठेवली. नेदरलँड्सचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका संघावरचा हा पहिलाच विजय आहे. नेदरलँड्सच्या ऍकरमनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून नेदरलँड्सला प्रथम फलंदाजी दिली. नेदरलँड्सने 20 षटकात 4 बाद 158 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 8 बाद 145 धावावर रोखत पहिला विजय नोंदवला. या स्पर्धेतील नेदरलँड्सचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी झिंबाब्वेचा पाच गडय़ांनी पराभव केला होता.
नेदरलँड्सच्या डावाला मायबर्ग आणि मॅक्स ओदाऊद यांनी सावध सुरुवात करून देताना 8.3 षटकात 58 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेच्या मार्करामने मायबर्गला रॉसोकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 30 चेंडूत 7 चौकारांसह 37 धावा जमविल्या. यानंतर केशव महाराजने डावातील 13 व्या षटकात मॅक्स ओदाऊदला रबाडाकरवी झेलबाद केले. त्याने 31 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 29 धावा केल्या. 12.4 षटकाअखेर नेदरलँड्सने 2 बाद 97 धावापर्यंत मजल मारली होती. टॉम कुपर आणि ऍकरमन या जोडीने संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. केशव महाराजने 15 व्या षटकात कुपरला झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 35 धावा जमविल्या. 15 षटकाअखेर नेदरलँड्सने 3 बाद 112 धावापर्यंत मजल मारली होती. नेदरलँड्सने शेवटच्या 5 षटकात 46 धावांची भर घातली. डी लीडे केवळ एका धावेवर नॉर्त्जेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. ऍकरमन आणि कर्णधार एडवर्डस् यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 35 धावांची भर घातली. ऍकरमनने 26 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 41 तर एडवर्डस्ने 7 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 12 धावा केल्या. नेदरलँड्सच्या पहिल्या चार फलंदाजांनी समयोचित फलंदाजी केल्याने नेदरलँड्सला 158 धावांपर्यंत मजल मारता आली. नेदरलँड्सच्या डावात 5 षटकार आणि 15 चौकार नेंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे केशव महाराजने 2 तर मार्कराम आणि नॉर्त्जे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार बवुमाने 2 चौकारासह 20, डि कॉकने 1 षटकार आणि 1 चौकारासह 13, रॉसोने 2 चौकारासह 25, मार्करामने 2 चौकारासह 17, मिलरने 1 चौकारासह 17, क्लासेनने 1 षटकारासह 21 तसेच केशव महाराजने 1 षटकारासह 13 धावा जमविल्या. मार्कराम आणि मिलर यांनी चौथ्या गडय़ासाठी 26 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज लवकर बाद झाले होते. नेदरलँड्सच्या ग्लोव्हरने आपल्या एका षटकात रॉसो आणि मिलर यांना बाद केले. डाव्यातील 17 व्या षटकात क्लासेन डी लीडेच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची स्थिती अधिकच नाजूक झाली. मायबर्गने शॉर्टकव्हरवर मार्करामचा अप्रतिम झेल टिपला. ग्लोव्हरने मिलर आणि पार्नेल यांना तीन चेंडूंच्या अंतरात बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची स्थिती 6 बाद 113 अशी झाली होती. क्लासेन 18 व्या षटकात बाद झाला. केशव महाराज शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर तंबूत परतला. अखेर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 8 बाद 145 धावा जमविल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान अनपेक्षितरित्या संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 3 षटकार आणि 9 चौकार नेंदविले गेले. नेदरलँड्सतर्फे ग्लोव्हरने आपल्या दोन षटकात 9 धावांच्या मोबदल्यात 3 गडी तसेच क्लासेनने 20 धावात 2, डी लीडेने 25 धावात 2 आणि मीकेरेनने 33 धावात एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः नेदरलँड्स 20 षटकात 4 बाद 158 (मायबर्ग 37, मॅक्स ओदाऊद 29, कुपर 35, ऍकरमन नाबाद 41, डी लीडे 1, एडवर्डस् नाबाद 12, केशव महाराज 2-27, नॉर्त्जे 1-10, मार्कराम 1-16), दक्षिण आफ्रिका 20 षटकात 8 बाद 145 (डिकॉक 13, बवुमा 20, रॉसो 25, मार्कराम 17, मिलर 17, क्लासेन 21, केशव महाराज 13, ग्लोव्हर 3-9, डी लीडे 2-25, क्लासेन 2-20, मीकेरेन 1-33).