आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त झोळंबे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या तृणधान्य जागरुकता व प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, झोळंबे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. निकिता नाईक, माजी सरपंच राजेश गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी परब, मुख्याध्यापक प्रविण देसाई, ग्रामपंचायत सदस्य संजना गवस, उज्वला कांबळे, शिक्षक संतोष गवस, शीतल गवस, देवेंद्र भैरवकर, तसेच सर्व विद्यार्थी, माता पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी डॉ. निकिता नाईक यांनी तृणधान्याच्या आहारातील वापराने कॉलेस्टरॉल, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, मधुमेह व कॅन्सर यांसारख्या आजारांवर मात करता येते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारामध्ये तृणधान्यांचा वापर करा असे आवाहन केले. यावेळी राजेश गवस, विशाखा नाईक, विनायक गाडगीळ, साक्षी परब, यांनी आहाराचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. तर श्रीम. राऊळ आजींनी आपल्या मनोगतात आज लुप्त झालेल्या कांग, पाखड या धान्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका शितल गवस यांच्या मार्गदर्शनाखाली तांदूळ, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, जवस या तृणधांन्यांचा वापर करून काढलेली रांगोळी खास आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सर्व माता पालकांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रविण देसाई यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष गवस यांनी केले.