6 एसपीओ 11-दनुष्का गुणतिलका
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या लंकन संघातील हुकमी फलंदाज 31 वर्षीय दनुष्का गुणतिलकाला रविवारी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपावरून अटक केल्याची माहिती लंकन संघाच्या प्रवक्त्याने दिली.
रविवारी सकाळच्या प्रहरी सिडनी शहर पोलीस स्थानकामध्ये ऑस्ट्रेलियन पोलिसांनी त्याला ठेवण्याचा निर्णय घेतला. 2 नोव्हेंबर रोजी एका महिलेचा लैंगिक छळ गुणतिलकाने केल्याचे आढळून आले. या प्रकरणाची कसून चौकशी ऑस्ट्रेलियन पोलीस करीत आहेत. बलात्काराच्या आरोपाखाली गुणतिलकाला अटक करण्यात आली आहे. लंकन संघाला शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे लंकन संघाचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे आव्हान संपुष्टात आले होते. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात डावखुऱया गुणतिलकाला नामिबिया विरुद्ध खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. सुपर 12 फेरी अखेर लंकन संघाने गट 1 मधून चौथे स्थान मिळवले होते.