वृत्तसंस्था/ ढाका
संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा तसेच ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी भारताचा माजी अष्टपैलू श्रीधरन श्रीरामची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर बातमी येथील एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केली आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून या दोन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी बांगलादेश संघाला भारताचा माजी अष्टपैलू एस. श्रीराम याचे बहुमोल मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्याची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या संचालकांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. 2000 ते 2004 या कालावधीत एस. श्रीरामने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 8 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघासाठी त्याची बऱयाच कालावधीसाठी सहाय्यक फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2016 साली एस. श्रीरामला ऑस्ट्रेलियाचे माजी प्रमुख प्रशिक्षक डरेन लिमन यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियन संघाला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर आयपीएल स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला मार्गदर्शन करण्यासाठी 46 वषीय एस. श्रीरामने ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपद सोडले. बांगलादेशच्या कसोटी संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा रसेल डॉमनिगो याच्याकडे मार्गदर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना होणार असून या सामन्यावेळी डॉमनिगो बांगलादेश संघाबरोबर राहील.