बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या विभागीय प्राथमिक व माध्यमिक फुटबॉल स्पर्धेत माध्यमिक गटात बेळगाव जिल्हा सेंट पॉल्स संघाने चिकोडी जिल्हा संघाचा 3-0, मुलींच्या गटात शिरसी संघाने बेळगाव संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2, प्राथमिक गटात बेळगाव संघाने धारवाड संघाचा 2-0 तर मुलींच्या गटात बेळगाव संघाने धारवाड संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून शिमोगा येथे होणाऱया राज्य स्पर्धेसाठी ते रवाना झाले.
सेंट मेरीज स्कूलच्या मैदानावर घेण्यात आलेल्या प्राथमिक गटात मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बेळगाव संघाने बागलकोट संघाचा 3-0 असा तर दुसऱया उपांत्य सामन्यात धारवाड संघाने चिकोडी संघाचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने धारवाड जिल्हा संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. बेळगावतर्फे अब्दुल्ला किल्लेदार व रायन पटवेकर यांनी गोल केले. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने धारवाड जिल्हा संघाचा 2-0 असा पराभव केला. बेळगावतर्फे वसुंधरा चक्हाण व सृष्टी यांनी गोल केले.
माध्यमिक गटात मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने हावेरी संघाचा 2-0 तर शिरसी संघाने धारवाड संघाचा टायबेकरमध्ये 4-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात शिरसी संघाने बेळगाव संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात चिकोडी संघाने धारवाड संघाचा 2-0 असा तर बेळगाव जिल्हा संघाने बागलकोट संघाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने चिकोडी संघाचा 3-0 असा पराभव केला. बेळगावतर्फे नेतन, नवल, अथर्व यांनी गोल केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हा शारिरीक शिक्षणाधिकारी डी. एस. डिग्रेज यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून मानस नायक, अल्लाबक्ष बेपारी, उमेश मजुकर, योगेश सांगावकर, विजय रेडेकर, शशांक बुळगुंडी, अभिषेक चेरेकर, शुभम झेंडे आदींनी काम पाहिले.