बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक राज्य टेबल टेनिस संघटना आयोजित राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या तनिष्का कपिल काळभैरवने 11 व 13 वर्षाखालील दोन्ही गटात विजेतेपदासह दोन सुवर्णपदके पटकाविली. दोन्ही गटात विजेतेपद पटकाविणारी तनिष्का ही बेळगावची दुसरी कन्या आहे.
बेंगळूर येथील मल्लेश्वरम येथील टेबल टेनिस सभागृहात झालेल्या या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीत तनिष्काने युक्ता हर्षाचा 11-5, 11-4, 11-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्काने आयरीन आण्णा हिचा 11-9, 11-8, 11-6 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
13 वर्षाखालील सबज्युनियर गटात उपांत्य फेरीत तनिष्काने शिवानी महेंद्रनचा 11-7, 11-4, 11-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्काने हिया सिंग हिचा 9-11, 12-10, 11-6, 11-7, 9-11, 13-11 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तनिष्का काळभैरवला टेबलटेनिस प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन तर वडील कपिल काळभैरव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.