सेन्सेक्स 773 अंकांनी कोसळला ः निफ्टीही नुकसानीसह बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच सादर करण्यात येणार आहे, तर दुसऱया बाजूला अमेरिकन पेंद्रीय बँक अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यांचीही लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच भारतीय भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा ठेवल्यामुळे सेन्सेक्सची चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी मोठी पडझड झाली आहे.
यासोबतच निफ्टीही घसरणीसह बंद झाला आहे. बीएसईमध्ये बुधवारच्या सत्रात दिवसअखेर सेन्सेक्स तब्बल 773.69 अंकांनी कोसळून निर्देशांक 60,205.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 226.35 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,891.95 वर बंद झाला आहे. याचदरम्यान गुंतवणूकदारांचे बुधवारी 3.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.
या क्षेत्रांची पडझड
प्रमुख क्षेत्रांपैकी बँक, ऊर्जा, सार्वजनिक बँक व रियल इस्टेट यांचे निर्देशांक 2-3 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. तसेच बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांकही घसरणीत राहिले.
प्रमुख कंपन्यांमध्ये आघाडीवरच्या स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक 4.30 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, विप्रो, बजाज फायनान्स, महिंद्रा ऍण्ड महेंद्रा व टाटा मोर्ट्स यांचे समभाग मोठय़ा घसरणीसोबत बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग सर्वाधिक 1.14 टक्क्यांनी वाढला आहे. यासह मारुती, टाटा स्टील व एनटीपीसीचे समभाग वधारुन बंद झाले आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी मजबूत होत 81.59 च्या स्तरावर बंद झाला आहे.