जेल क्वॉर्टर्समधील चोरीचा उलगडा
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाजवळ असलेल्या क्वॉर्टर्समध्ये चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कोडसगट्टी (ता. बैलहोंगल) येथील एका तरुणाला अटक केली आहे. क्वॉर्टर्समधून चोरलेले दागिने त्याने बँकेत गहाण ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
मल्लसर्ज गंगाप्पा कोटबागी (वय 26, रा. कोडसगट्टी) असे त्याचे नाव आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
30 नोव्हेंबर 2022 रोजी हिंडलगा जेल क्वॉर्टर्समधील हेडवॉर्डर बसवराज परगोण्णावर यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून साडेचार तोळ्यांचे दागिने पळविण्यात आले होते. या प्रकरणी बसवराज यांची पत्नी शांता यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे. मल्लसर्जला अटक करून त्याच्याजवळून 46 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चोरीनंतर संशयित आरोपीने हे दोगिने कित्तूर येथील एका खासगी बँकेत गहाण ठेवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.