पेडणे येथे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच : माविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून हटवा : अखिल गोवा टॅक्सी असोशिएशनचे अध्यक्ष चेतन कामत यांची मागणी
पेडणे : गेले अनेक महिने टॅक्सी व्यावसायिकांना मोपा विमानतळ प्रकल्पावर टॅक्सी काऊंटर अधिसूचित करून काऊंटर द्यावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनकर्त्या टॅक्सी व्यावसायिकांची थट्टा चालविणाऱ्या वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना मंत्रिपदावरून त्वरित हटवा, अशी मागणी अखिल गोवा टॅक्सी असोशिएशनचे अध्यक्ष चेतन कामत यांनी पेडणे येथे केली. टॅक्सी काऊंटर अधिसूचित होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. या आंदोलनाला गोवा टॅक्सी असोशिएशनचा पूर्णपणे पाठिंबा राहिल, असा इशारा कामत यांनी दिला. मनोहर आंतराष्ट्रीय काळी-पिवळी टॅक्सी स्टॅन्ड जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन असेच चालू राहील, सरकारने 144 कलम लागू करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला तरीही सरकारने वेळप्रसंगी पेडणे शहरांमध्ये 144 जरी कलम लावलं तरी आम्हाला त्याचा परवा नाही. उच्च न्यायालयाने 144 कलमाची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. एक मे रोजी धरणे आंदोलन करत असताना नागझर येथे सरकारला 24 तासाची मुदत देऊन मोपा विमानतळ मार्गावर रास्तारोकोचा इशारा दिला होता, त्याची गंभीर दखल घेत सरकारने पूर्वसंध्येला 144 कलम लागून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
गोवा फॉरवर्डचे नेते तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर यांनी आंदोलनकर्त्यना पाठिंबा देत असताना टॅक्सी व्यावसायिक आपल्या हक्काचा अधिकार मिळावा यासाठी लोकशाहीच्या मार्गातून आंदोलन करत असतानाच ,सरकारने हे आंदोलन कसे चिघळणार यावर लक्ष केंद्रित करून 144 कलम लावून आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असा आरोप केला आहे. सरकारनेही 144 कलम लावले तरीही ते वाढत राहील, असा इशारा दीपक कलंगुटकर यांनी यावेळी दिला. गेल्या चार महिन्यांपासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सोबत अनेकवेळा बैठका होऊन चर्चा झाली. मात्र आजपर्यंत कसलीच मंजुरी दिली नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कायदा हातात घेण्यासाठी वेळ येऊ नये, असे काही अनुचित प्रकार घडल्यास याला मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो तसेच स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर जबाबदार असतील, असा इशारा अॅड. जितेंद्र गावकर यांनी यावेळी दिला. जनतेला 144 कलमाखाली दाबून ठेवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. जर आपले प्रश्न सुटत नाही तर ते रस्त्यावर का येणार नाही? असा अॅड. सवाल प्रसाद शहापूरकर यांनी उपस्थित केला. अखिल गोवा टॅक्सी असोसिएशन संघटना गोवा फॉरवर्डचे अॅड. शैलेंद्र गावस, चेतन कामत, सॅक होल्डर आदींनी पाठिंबा दिला. रमाकांत तुळसकर यांनही सरकारवर टीका केली.