बेळगाव : प्रजासत्ताकदिनी प्लास्टिकचे ध्वज व इतर माध्यमातून राष्ट्रध्वजाचे होणारे विडंबन थांबवावे, यासाठी आज हिंदू जनजागृती समिती व इतर संघनाच्या वतीने जिल्हाधीकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
२६ जानेवारी रोजी विक्री केल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या ध्वजाला बंदी आहे. तरीही त्याची विक्री होते. तसेच कमी आकाराचे ध्वज व तिरंग्याच्या बॅच लहान मुले वापरतात. वाहनांवर लावल्या जातात. पण दुसऱ्या दिवशी ते कुठेतरी रस्त्यावर पडलेले असते. हे असे राष्ट्रध्वजाचे होणारे विडंबन थांबले पाहिजे. तसेच अशा प्रकारची रांगोळीही लोकांनी घालू नये, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या उज्ज्वला गावडे यांनी केले आहे.
तसेच हिंदू जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने अशा प्रकारच्या ध्वज निर्मितीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समिती कार्यकर्ते उपस्थित होते.