ग्रामस्थांच्या मागणीला यश ; सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांकडून पाहणीनंतर आश्वासन
वार्ताहर /किणये
मच्छे गावाजवळ बेळगाव-पणजी महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी मच्छे ग्रामस्थांच्यावतीने सात-आठ महिन्यांपासून होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, मच्छे नगरपंचायत यांना निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मंगळवारी सकाळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मच्छे येथे रास्तारोको करण्याचे ठरवून सर्वजण रस्त्यावर उतरले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व पोलिसांनी उपस्थित होऊन रास्तारोको करणाऱयांना महामार्गावर गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिल्यामुळे रास्तारोको स्थगित करण्यात आला.
बेळगाव-पणजी महामार्गाच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. एलकेजी, युकेजी, प्राथमिक मराठी व कन्नड शाळा, हायस्कूल तसेच कार्यालये, संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी व स्थानिक नागरिकांची नेहमी वर्दळ असते. महामार्ग असल्याने बेळगावहून पणजी-गोव्याला जाणारी व येणारी वाहने सुसाट वेगाने धावतात. मुख्य रस्त्याच्या ठिकाणी अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? असा सवाल उपस्थित ग्रामस्थांनी केला.
विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका
शाळा-हायस्कूल असल्याने महामार्गाच्या एका बाजूने दुसऱया बाजूला विद्यार्थ्यांना जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गावातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱयांची नेहमी वर्दळ या रस्त्यावर दिसून येते. मात्र, सुसाट वेगाने धावणाऱया वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. मुख्य बसस्टॉप, वाघवडे क्रॉस, आनंद गल्ली क्रॉस व अन्य दोन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी वारंवार केली होती.
15 दिवसांपूर्वी मच्छे ग्रा.पं. माजी सदस्य सचिन बेळगावकर व काही तरुणांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना निवेदन दिले होते. 8 दिवसांपूर्वी सुरेश लाड व चांगाप्पा हावळ यांच्या नेतृत्वाखाली मच्छे नरगपंचायतीला निवेदन देऊन गतिरोधक बसवावेत, अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीच हालचाल झाली नसल्यामुळे संतप्त नागरिक मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरले. मात्र, एवढय़ात वडगाव ग्रामीणचे सीपीआय श्रीनिवास हंडा दाखल झाले. त्यांनी रास्तारोको केल्यास महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. तुम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांशी चर्चा करा व तोडगा काढा, असे सांगितल्यानंतर नागरिक शांत झाले.
अधिकाऱयांचे सूचक आश्वासन
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी रमेश मेत्री व त्यांचे सहकारी आणि मच्छे नगरपंचायतीचे नोडल अधिकारी शिवकुमार यांनी मच्छेजवळील महामार्गाची पाहणी करून आठ दिवसात गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सचिन बेळगावकर, सुरेश लाड, मारुती लाड, शंकर बेळगावकर, चांगाप्पा हावळ, शंकर धामणेकर आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.