वृद्धाने आतापर्यंत लाखो रुपये केले दान
आईचा एक संदेश अनोळखी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एका वृद्धाने लाखो रुपये खर्च केले आहेत. या व्यक्तीची कहाणी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा वृद्ध अनोळखी लोकांना पैसे देतो, ज्या लोकांना पैसे देतो, त्या लोकांकडून हा वृद्ध केवळ ‘प्रेमाचा संदेश’ पसरवतील एवढीच अपेक्षा करतो.
वृद्ध व्यक्तीने हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. हे सर्व तो स्वतःच्या आईच्या ‘अंतिम संदेशा’करता करत आहे. ‘सर्वांवर प्रेम करा’ असे त्याच्या आईने अखेरच्या क्षणांमध्ये त्याला सांगितले होते. आता याच संदेशाचा तो स्वतःच्या पद्धतीने प्रचार-प्रसार करत आहे.
या वृद्ध व्यक्तीची कहाणी केविन केट नावाच्या ट्विटर युजरने शेअर केली आहे. केविन केट हा एक ऍड मेकर आहे. त्याने स्वतःच्या ट्विटमध्ये या व्यक्तीचे छायाचित्र पोस्ट केले आहे. ‘हा व्यक्ती रेस्टॉरंटच्या एका टेबलवर बसला होता, त्याच्याकडे रोख रक्कम होती, कागदाचे अनेक तुकडे होते, या तुकडय़ांवर ‘सर्वांवर प्रेम करा’ असे लिहिले होते असे केविनने सांगितले.
केविनने या वृद्ध व्यक्तीला तुम्ही या पैशांचे काय करता अशी विचारणा केली होती. यावर वृद्धाने लोकंना 1 डॉलरपासून 5 डॉलर्सपर्यंत रक्कम देत असून 2014 पासून असेच करत आल्याचे सांगितले. आतापर्यंत या वृद्ध व्यक्तीने 10 लाख रुपये अनोळखी लोकांमध्ये वाटले आहेत. या सर्व अनोळखी माणसांना तो रेस्टॉरंटमध्ये भेटला आहे.
सर्वांवर प्रेम करा याचा नेमका अर्थ काय असे केट यांनी विचारले असताना वृद्ध व्यक्तीने माझ्या आईचे हे अखेरचे शब्द होते एवढेच उत्तर दिले. स्वतःच्या आईसाठी या वृद्ध व्यक्तीने दाखविलेले प्रेम लोकांना कौतुकास्पद वाटत आहे. अनेक लोकांनी ही कहाणी जगासमोर आणणाऱया केविन केटचे देखील कौतुक केले आहे.