दाजी साळकर यांची पत्रकार परिषदेतून सूचना क्रूझ टर्मिनलवर टॅक्सी काऊन्टरची गरज
प्रतिनिधी /वास्को
मुरगाव बंदरात विदेशी पर्यटकांच्याबाबतीत घडलेली घटना गोव्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट असून यात गुंतलेल्यांविरुद्ध कडक कारवाई व्हायलाच हवी. घटना घडून गेल्यानंतर माफी मागण्यातही अर्थ नाही. भविष्यात असा प्रकार घडू नये याची काळजी घ्या, असे सूचवताना वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी मुरगाव बंदरात टॅक्सी सेवेसाठी काऊन्टर खोलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
आमदार दाजी साळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना मागच्या बुधवारी मुरगाव बंदरात पर्यटकांना अपमानीत करण्याची टॅक्सी व्यवसायिकांकडून घडलेली घटना हा गंभीर विषय असल्याचे स्पष्ट करून असे घडायलाच नको होते. आता माफी मागू काही अर्थ नाही. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. येणारे पर्यटक आपले अतिथी आहेत. ‘अतिथी देवो भव’ असे म्हटलेले आहे. ते गोव्यासाठी देवासमान आहेत. मात्र, मुरगाव बंदरात टॅक्सी व्यावसायिकांनी पर्यटकांप्रती केलेल्या वर्तनामुळे देशात नव्हे तर जगभर गोव्याच्या नावा बट्टा लागलेला आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी आणि जे कुणी घडलेल्या घटनेत गुंतलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आमदार साळकर यांनी केली.
ही चुकीची घटना घडल्यानंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी त्वरित दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून आमदार साळकर यांनी मुरगाव बंदरातील क्रूझ टर्मिनलजवळ पर्यटकांच्या सेवेसाठी टॅक्सी बुकिंग काऊंटर खोलण्याची मंत्री रोहन खंवटे यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत केले. मुरगाव बंदरात काऊन्टरची गरज आहे. गोव्यात ग्राहक मिळवण्यासाठी पर्यटकांची टॅक्सी व्यावसायिकांकडून बऱयाच ठिकाणी खेचाखेची होती. काऊन्टरमुळे चुकीचे प्रकार घडणार नाही. पर्यटक टॅक्सी व्यवसाय सुरळीत राहिल असे ते म्हणाले. वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनीही पर्यटकांच्याबाबती बंदरात घडलेल्या घटनेची दखल घेत कारवाई करण्याचे दिलेले संकेत योग्यच पाऊल असल्याचे आमदार साळकर यांनी म्हटले आहे.
बंदरातील वाहतुकीच्या प्रश्नावर दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
मुरगाव बंदरातून होणारे कोळसा प्रदुषण कदापी सहन केले जाणार नाही. रस्त्यांवर सांडणारा माल व त्याव्दारे होणारे प्रदुषण रोखायलाच हवे. वरूणापुरी ते हेडलॅण्ड हा महामार्ग मालवाहतुकीसाठी उपयोगात यायलाच हवा. वास्को शहरातून ही वाहतूक नको. मुख्यमंत्र्यांकडे या विषयी आपण बोललो आहे. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत या प्रश्नावर बैठक होईल अशी माहिती आमदार साळकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक गिरीष बोरकर व मुरगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर उपस्थित होते.
खनिज उद्योगामुळे गोव्याला समृद्धीचे दिवस येतील
आमदार दाजी साळकर व उपस्थित मान्यवर नेत्यांनी यावेळी गेली दहा वर्षे बंद राहिलेला गोव्यातील खनिज उद्योग सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल त्यांचे आभार मानले. खनिज उद्योग सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने पुढील काळात गोव्याच्या समृद्धीत भर पडेल. चांगले दिवस पाहायला मिळतील असे आमदार साळकर म्हणाले.