नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नेपाळमधील नाईटक्लबमध्ये राहुल गांधी पार्टीत दंग असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्याने भारताच्या राजकीय वर्तुळात मोठी राजकीय खळबळ उडाली असतानाच त्यांच्या मैत्रिणीमुळे एक नवाच वाद निर्माण झाला आहे. आपल्या ज्या मैत्रिणीच्या विवाहाच्या निमित्ताने राहुल गांधी नेपाळला गेले आहेत, त्या सुमनिमा उदास यांचे वडील भारत विरोधी भूमिका घेणारे आहेत, हे उघड झाल्याने अशा मैत्रिणीशी राहुल गांधींचे नजीकचे संबंध कसे, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.
सुमनिमा उदास यांचे वडील नेपाळचे म्यानमारमधील राजदूत होते. भारताच्या उत्तराखंड राज्याच्या काही प्रदेशावर नेपाळने आपला दावा सांगितला असून हा उदास यांचे वडील या दाव्याचे समर्थक आहेत. त्यांनी उघडपणे नेपाळच्या दाव्याला अनेकदा पाठिंबा दिला आहे. अशा भारतविरोधी भूमिका घेणाऱया व्यक्तीची कन्या राहुल गांधींची मैत्रिण आहे. राहुल गांधी अशाच भारतविरोधी लोकांसमवेत मैत्री का करतात, असा प्रश्न भाजपच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी विचारला आहे. चीन असो किंवा नेपाळ, राहुल गांधीचे संबंध भारतविरोधी व्यक्तींशीच असतात, यामागचे गुपित काय, अशीही पृच्छा त्यांनी केली.
सोशल मिडियावर गदारोळ
राहुल गांधी यांच्या नाईटक्लबमधील उपस्थितीसंबंधी आणि तेथील पार्टीत दंग असल्यासंबंधी सोशल मिडियावर मंगळवारपासूनच गदारोळ सुरु आहेत. असंख्य नेटीझन्सनी राहुल गांधी यांना ट्रोल केले असून त्यांच्यावर अनेक मीम्सही पोस्ट करण्यात आल्या आहेत. काँगेसच्या प्रवक्त्यांनी राहुल गांधी यांच्या नेपाळ दौऱयासंबंधी सारवासारवी करण्याचा प्रयत्न चालविला असतानाच उदास यांच्यासंबंधीचा पर्दाफाश झाल्याने हा गदारोळ अजूनच वाढला आहे.