ट्विन टॉवर्सभोवती कडक बंदोबस्त, ड्रोन उडवण्यावर बंदी, वाहतूक मार्गातही बदल
नोएडा / वृत्तसंस्था
नोएडातील बहुचर्चित ट्विन टॉवर रविवार, 28 ऑगस्ट रोजी पाडण्यात येणार आहेत. सुपरटेक ट्विन टॉवर पाडले जाणार असल्यामुळे नोएडा पोलिसांनी 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ड्रोनवर बंदी घातली आहे. सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी हा निर्णय घेतला. रविवारी दुपारी 2.30 वाजता 3,700 किलो स्फोटकांच्या सहाय्याने काही सेकंदात हे ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त केले जाणार आहेत. यादरम्यान तेथे तैनात करण्यात येणाऱया पोलिसांची संख्या वाढवण्यात आली. तेथे 400 पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर 150 ते 200 वाहतूक पोलीसही तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय चार फायर इंजिन आणि डझनहून अधिक अग्निशमन दलाच्या गाडय़ा तैनात करण्यात येणार आहेत.
ट्विन टॉवर्स पाडण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. नोएडा पोलिसांनीही ट्विन टॉवर्सभोवती सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. टॉवर पाडण्याच्या दिवशी सुमारे 400 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. टॉवरभोवती काही वाहतूक कर्मचारीही तैनात असतील. तसेच एक्स्प्रेस वेच्या आजूबाजूला वाहतूक कर्मचारीही तैनात असतील.
नॅशनल बिल्डींग कोडचा भंग केल्यामुळे सदर ‘ट्विन टॉवर’ उद्ध्वस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आणि सर्वोच्च न्यायालयाकडून ते कायम राखण्यात आले. 24 मजले मंजूर असताना तब्बल 40 मजले बांधण्यात आल्यामुळे बहुमजली इमारतीवर कारवाई केली जात आहे. या ट्विन टॉवरची मूळ जागा पार्कसाठी आरक्षित होती. सुपरटेक बिल्डर्स व नोएडा ऑथोरिटीच्या संगनमताने नियमांचा भंग झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.