ऑनलाईन टीम / तरुण भारत :
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (Subodh Mohite) यांनी पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा दिला आहे. विकासाच्या मुद्यावर आपण अजित पवार गटाला पाठिंबा देत असल्याचे मोहिते यांनी म्हटले आहे. वर्ध्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत सामील झाल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. 40 पेक्षा जास्त आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला असल्याने पक्ष बांधणीसाठी आता शरद पवार महाराष्ट्र दौरा करत आहेत. याचदरम्यान, शरद पवार गटात असलेले माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आपल्या 50 पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा देत अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे.
सुबोध मोहिते हे रामटेकमधून खासदार होते.
विकासाचा मुद्दा पुढे करत अनेक आमदार आणि जिल्हापातळीवरील पदाधिकारी अजित पवारांना पाठिंबा देत आहेत. मोहिते यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.