साट्रे येथील श्याम गावकर यांनी पिकविली स्ट्रॉबेरी
उदय सावंत/साट्रे
सत्तरी तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या साट्रे गावातील युवा शेतकरी श्याम गावकर यांनी स्ट्रॉबेरी लागवड करून ती यशस्वी केलेली आहे. सध्या त्यांच्या शेतीमध्ये स्ट्रॉबेरीच्या पिकाला सुऊवात झाली असून येणाऱ्या जवळपास महिनाभरात संपूर्ण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी निघणार आहे आतापर्यंत स्ट्रॉबेरी सारखे उत्पादन हे देशातील महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी होऊ शकते अशा प्रकारचा समज होता. सत्तरी तालुका हा पूर्णपणे गर्द झाडीने वेढलेला आहे. या भागांमध्ये निर्माण होणाऱ्या थंड हवेचा लाभ घेत साट्रे येथील श्याम गावकर यांनी स्ट्रॉबेरीची लागवड दोन वर्षापासून सुरू केलेली आहे. गोवा राज्याच्या कृषी खाते व वाळपई येथील विभागीय कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाच्या बळावर त्यांनी हे धाडस केले.
दीड महिन्यापूर्वी केले होते लागवड
आवश्यक स्वरूपाची पूर्वतयारी व शेतीची मशागत करून दीड महिन्यापूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड केली. अनेक प्रकारच्या समस्यांना समर्थपणे तोंड देत ही लागवड आता हळूहळू यशस्वी होऊ लागल्याचे समाधान आपणास वाटत आहे. स्ट्रॉबेरी हे पीक आपल्या देशामध्ये आधुनिक शेतीच्या व्यवसायात मोडत असते. सत्तरी तालुक्यासारख्या पारंपरिक शेती विकसित करणाऱ्या भागांमध्ये अशा प्रकारचे पिक तयार होऊ शकते याबद्दल आजही आपल्याला विलक्षण वाटत असल्याचे श्याम शाम गावकर यानी संवाद साधताना स्पष्ट केले.
सहा महिन्यांचे पिक
गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यापर्यंत यासंदर्भात पिक मिळू शकते. आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने लागवड केलेली आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात याच झाडांचा वापर करून लागवडीचा विस्तार करण्याचा आपला विचार आहे. अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत आतापर्यंत गोव्यामध्ये एक प्रगतशील युवा शेतकरी म्हणून प्रतिमा निर्माण केलेली आहे. कृषी खात्याचा युवा शेतकरी म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत आपल्या मातीमधून वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र विकसित करताना आधुनिक स्वरूपाची लागवड करण्याची जिद्द यामुळेच आज स्ट्रॉबेरी सारख्या लागवडीमध्ये यशस्वी होऊ शकलो आहे, असे त्यांनी सांगितले.
बाजारपेठेची चिंता करण्याची गरज नाही
सध्या साट्रे भागातील बारामाही वाहणाऱ्या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच गावकर यांची स्ट्रॉबेरीची शेती आहे. यामुळे चांगल्याप्रकारे पिकाचे उत्पन्न आल्यानंतर बाजारपेठ शोधण्याची गरज नाही. कारण देशी विदेशी पर्यटक हमखासपणे या फळांकडे आकर्षित होऊ शकतो. सत्तरी तालुक्याच्या मातीमध्ये एक वेगळ्या प्रकारची गोडी आहे. या गोडीचा स्वाद निश्चित प्रमाणात स्ट्रॉबेरीच्या फळांमध्ये येणार व वेगवेगळ्या प्रकारच्या फळाची निर्मिती या भागामध्ये होणार असा विश्वास शाम गावकर यांनी व्यक्त केला.
श्याम गावकर धडपडी व प्रयोगशील शेतकरी : विश्वनाथ गावस
शाम गावकर हे जरी ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व असले तरीसुद्धा गावातील निसर्गाच्या सानिध्यात राहणारे व्यक्तिमत्व आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानासुद्धा त्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करून ते यशस्वी करून दाखविले आहेत. सध्या त्यांनी स्ट्रॉबेरी बरोबरच कारले, मिरची, दोडकी, काकडी लागवड केलेली आहे. सत्तरी तालुक्यातील प्रयोगशील युवा शेतकरी म्हणून श्याम गावकर यांची वाटचाल खरोखरच येणाऱ्या काळात सत्तरी तालुक्याच्या कृषी विकासाला एक वेगळ्या प्रकारचा आयाम देणारी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना वाळपईचे विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले.