प्रतिनिधी /येळ्ळूर
सुळगे (येळ्ळूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील होते. लेझीम पथक, योग प्रात्यक्षिके व मंगलकलश घेऊन सामिल झालेल्या महिलावर्गांमुळे कार्यक्रम चैतन्यमयी वातावरणात पार पडला.
अमृतमहोत्सव नगरीच्या कमानीशेजारी कॉ. परशराम कुकडोळकर व संभाजी कुकडोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचे पूजन उद्योजक महादेव निलजकर यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन रवि हाजगोळकर, डॉ. संतोष पाटील, श्रीकांत थोरवत, मारुती होनगेकर, विष्णू लोहार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रास्ताविक बी. बी. पाटील यांनी केले.
स्वागताध्यक्ष यल्लाप्पा कणबरकर व शाळा सुधारणा कमिटी सदस्यांच्यावतीने उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून स्वागत केले. परिसरातील प्राथमिक शाळा, हायस्कूलच्या मुख्याध्यापक व शिक्षकवर्गांचे स्वागत जय भवानी युवक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर नावगेकर व इतर सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी, शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेतला. शाळेची झालेली प्रगती तसेच या शाळेतून शिक्षण घेवून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी उल्लेख करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. या अमृतमहोत्सवाला सुळगा, राजहंसगड यासह इतर परिसरातील विद्यार्थी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.