वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या पुरुषांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेतील दुसऱया सामन्यात सूर्यकुमारने दमदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. भारताने ही मालिका 1-0 अशी जिंकली.
टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत सूर्यकुमार यादव 890 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर असून पाकचा मोहम्मद रिझवान 836 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. यादव आणि रिझवान यांच्यात 54 गुणांचा फरक आहे. न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज कॉनवेने तिसरे स्थान मिळविले आहे. भारताविरुद्धच्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात कॉनवेने 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत न्यूझीलंडचा फिलिप्स सातव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा टिम साऊदी संयुक्त 14 व्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंडय़ाने न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नाबाद 30 धावा झळकविल्याने त्याने फलंदाजांच्या यादीत संयुक्त 50 वे स्थान मिळविले आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचे भुवनेश्वर कुमार 11 व्या, अर्शदीप सिंग 21 व्या तर यजुवेंद्र चहल 40 व्या स्थानावर आहेत.
पुरुषांच्या वनडे मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि हेड यांचे स्थान वधारले आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात वॉर्नर आणि हेड यांनी आपली वैयक्तिक शतके नोंदविताना 269 धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात वॉर्नरने 106 धावा तर हेडने 152 धावा जमविल्या होत्या. फलंदाजांच्या मानांकन यादीत वॉर्नर पाचव्या स्थानावर तर हेड तिसाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथने सातवे स्थान मिळविले आहे. वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने चौथे स्थान तर झाम्पाने सातवे आणि कमिन्सने 17 वे स्थान घेतले आहे.