केपे पोलिसांची उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाई
केपे : पारोडा, केपे येथे अर्जुन शर्मा (वय 25) या बिहारच्या कामगाराचा मोबाईलच्या क्षुल्लक कारणावरून खून केल्याप्रकरणी मूळ उत्तर प्रदेशातील संशयित प्रदीप यादव याला 48 तासांत उत्तर प्रदेशमध्ये जाऊन अटक करण्यात केपे पोलिसांना यश मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी पारोडा येथील स्थानिकांच्या नजरेस अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा व तपास केला असता तो मृतदेह बिहारी कामगार अर्जुन शर्माचा असल्याचे स्पष्ट झाले होते. यासंबंधी केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात दिसून आल्याप्रमाणे मोबाईलवरून वाद झाल्याने अर्जुन शर्मा याचा खून करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संशयित प्रदीप यादव हा 2100 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुशीनगर, उत्तर प्रदेश येथील आपल्या मूळ गावी रेल्वेने पसार झाला. मात्र केपेचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शिवराम गावस व सहकाऱ्यांनी ताबडतोब उत्तर प्रदेशमध्ये धाव घेऊन कासिया बसस्थानकावर त्याला अटक केली. संशयिताला गोव्यात आणले जात आहे.