वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2028 साली होणाऱया लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आयसीसीने सहा संघांमधील टी-20 क्रिकेट प्रकाराची शिफारस केली असून या नव्या प्रकाराच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय येत्या ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती घेणार आहे.
ऑलिम्पिक या आंतरराष्ट्रीय प्रति÷sच्या स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न चालू आहेत. 2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटच्या टी-20 प्रकाराचा समावेश करावा, असे आयसीसीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला विनंती केली आहे. सदर स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी केवळ सहा संघांमध्ये घेण्याबाबतची शिफारस आयसीसीने केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत क्रिकेटचा समावेश करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. येत्या मार्च महिन्यात आयओसीकडून ऑलिम्पिक स्पर्धेतील नव्या क्रीडा प्रकारांच्या समावेशाची यादी निश्चित केली जाणार आहे. आयसीसीचे ऑलिम्पिक कार्यकारी गटाचे प्रमुख तसेच आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्कले, त्याचप्रमाणे बीसीसीआयचे सचिव जय शहा, स्वतंत्र संचालक इंद्रा नुयी आणि अमेरिकन क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष पराग मराठे यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे प्रयत्न चालू असल्याचे जय शहा यांनी सांगितले आहे. लॉस एंजिल्सच्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट, बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोसी, बेक डान्सिंग, कराटे, किक बॉक्सिंग, स्क्वॅश आणि मोटरस्पोर्ट्स या नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.