वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या तैपेई खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉयच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनची विश्व टूरवरील ही सुपर 300 दर्जाची बॅडमिंटन स्पर्धा आहे. नुकत्याच झालेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत प्रणॉयला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. सुपर 1000 दर्जाच्या इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयने आपल्या कामगिरीत सातत्य राखत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती पण उपांत्य लढतीत त्याला डेन्मार्कच्या टॉप सिडेड व्हिक्टर अॅक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला होता.
तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एच. एस. प्रणॉय, मेरीबा लुवांग मेसनाम भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. दरम्यान पुरुष एकेरीच्या विभागात किरण जॉर्ज, सतीशकुमार, करुणाकरण, मिथुन मंजुनाथ, एस. शंकर मुथूस्वामी सुब्रह्मनीयन, मिथून मंजुनाथ, शुभंकर डे आणि पी. काश्यप यांचाही सहभाग राहिल. पण या बॅडमिंटनपटूंना पात्र फेरी पार करावी लागेल. मेसनामला प्रमुख ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या लाँगशी लढत द्यावी लागेल. या स्पर्धेत नाराओकाला टॉप सिडींग देण्यात आले आहे. चीन तैपेईचा चेनला द्वितीय सिडींग तर निशीमोटोला चौथे सिडींग देण्यात आले आहे.
महिलांच्या विभागात भारताची लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल, मालविका बनसूद, आकर्शी काश्यप, ऋत्विका ग•s यांचा सहभाग आहे. सायना नेहवाल पुन्हा सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. सायनाचा सलामीचा सामना थायलंडच्या सी. पोर्नपिचा बरोबर तर मालविकाचा सलामीचा सामना झेंगशी होणार आहे. अलिकडेच इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविणारी भारताची जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी तैपेईमध्ये मंगळवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी कृष्णप्रसाद गर्ग आणि विष्णूवर्धन गौड ही जोडी भारताचे प्रतिनिधित्व करेल. महिला दुहेरीत ऋतूपर्णा पांडा आणि स्वेतपर्णा पांडा भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर स्तरावर विविध ठिकाणी 28 विविध दर्जाच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यापैकी सुपर 1000 दर्जाच्या 4, सुपर 750 दर्जाच्या 6, सुपर 500 दर्जाच्या 7, सुपर 300 दर्जाच्या 11 स्पर्धांचा समावेश आहे.