क्षणार्धात होणार शत्रूचा खात्मा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात निर्मित अत्याधुनिक ड्रोन म्हणजेच मानवरहित यान (युएव्ही) पुढील आठवडय़ात उड्डाण करणार आहे. तपस ड्रोन पुढील आठवडय़ात बेंगळूरमध्ये आयोजित होणाऱया एयरो इंडिया शोमध्ये पहिल्यांदा सर्वांसमोर उड्डाण करताना दिसून येणार आहे. यानंतर या ड्रोनचा भारतीय सैन्याच्या ताफ्यात समावेश केला जाणार आहे.
एअरो इंडिया शोमध्ये डीआरडीओच्या तपस ड्रोनसोबत 180 हून अधिक विमाने उड्डाण करणार आहेत. तपस-बीएच या एअरो शोमध्ये स्वतःच्या वैशिष्टय़ांचे प्रदर्शन करणार आहे. तपससोबत अन्य स्वदेशी लढाऊ ड्रोन ‘घातक’ देखील जून-जुलैमध्ये स्वतःचे पहिले उड्डाण करण्यासाठी तयार आहे.
तपसचे पूर्ण नाव टॅक्टिकल एअरबोर्न प्लॅटफॉर्म फॉर एरियल सर्व्हिलान्स बेयॉन्ड होराइजन आहे. तपसची निर्मिती डीआरडीओने केली आहे. तपस ड्रोन सीमांवर देखरेख ठेवण्यासह शत्रूंवर हल्ला करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो. 2016 पासूनच तपसची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. परंतु अद्याप याचा भारतीय सैन्यात समावेश करण्यात आलेला नाही. एअरो शोमधील उड्डाणानंतर तपस ड्रोनचा भारतीय सैन्यात लवकरच समावेश केला जाणार असल्याचे मानले जात आहे.
तपस ड्रोन 28 हजार फुटांच्या उंचीवर 18 तासांहून अधिक काळापर्यंत उड्डाण करू शकतो. तपस एक मीडियम अल्टीटय़ूट लाँग-इंडय़ुरेन्स ड्रोन असून तो अमेरिकेच्या एमक्यू-1 प्रिडेटर ड्रोनसारखाच आहे. तपस ड्रोन स्वतःहून टेकऑफ अन् लँड करण्याची क्षमता बाळगून आहे. तपस ड्रोनला यापूर्वी ‘रुस्तम 2’ या नावाने ओळखले जायचे. 20.6 मीटर इतका पंखांचा आकार असलेला तपस ड्रोन सलग 1 हजार किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकतो.