ईव्ही, ग्रीन एनर्जीत गोव्याला अग्रणी बनविणार
पणजी : ईलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स सुविधा उभारणीतील अग्रणी कंपनी असलेल्या टाटा पॉवरने गोव्यात 100 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे. या कंपनीने यापूर्वीच गोव्यात 50 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स सुरूही केले आहेत. राज्याला जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवरही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. हरित ऊर्जेवर भर देण्यासाठी कंपनी राज्य सरकारसोबत काम करत असून त्याचाच भाग म्हणून ही स्टेशन्स स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ईव्ही आणि ग्रीन एनर्जीचा अवलंब करण्यासाठी गोवा ही एक मजबूत बाजारपेठ म्हणून आम्ही निवड केली आहे, असे ते म्हणाले. त्यानुसार येत्या वर्षभरात किमान 100 ईव्ही स्टेशन्स स्थापन करण्याची योजना आहे. त्याशिवाय येथून मुंबई, पुणे आणि कारवार या महामार्गावरही आमच्याकडे चार्जर्स आहेत, असे त्यांनी सांगितले.
डिसेंबर 2021 मध्ये, राज्य सरकारने गोवा इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग सुविधा योजनेखाली 50 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स स्थापित करण्याच्या धोरणास सवलत दिली होती. अशी स्टेशन्स सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेत स्थापन करण्यासाठी गोवा उर्जा विकास एजन्सीतर्फे मान्यता देण्यात येते. कंपनीच्या योजनेनुसार पेट्रोल पंप, रेल्वे स्थानके, शॉपिंग मॉल, व्यावसायिक इमारती, रिसॉर्ट्स आणि मुबलक जागा उपलब्ध असलेल्या कोणत्याही मोठ्या पार्किंगच्या ठिकाणी ही प्रस्तावित स्टेशन्स स्थापन करण्यात येणार आहेत. गोवा सरकारने ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यास विविध योजना जाहीर केल्यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरने गोव्याकडून आपले हरित ऊर्जा लक्ष्य कशाप्रकारे पूर्ण करता येईल यावर ’डेस्कटॉप प्रोजेक्शन’ पूर्ण केले आहे, असे सदर अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, टाटा पॉवरने गोवा वीज खात्यासोबत वितरण तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर बिलिंग, वीज खात्याच्या 248 विभाग आणि उपविभागांचे संगणकीकरण, वीज खात्यासाठी डेटा सेंटर तसेच हैद्राबाद येथील बॅकअप डेटा सेंटर आणि ऑनलाइन बिल भरणा अर्ज, यावर काम केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.