दिलेली नियुक्तीपत्रे घेतली परत, पुढील आदेशाची प्रतीक्षा
बेळगाव : शिक्षण विभागाकडून मंगळवारी सकाळपासून शिक्षक बदलीसाठी कौन्सिलिंगची प्रक्रिया सुरू होती. परंतु दुपारनंतर तांत्रिक कारण देत प्रक्रिया थांबविण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत कौन्सिलिंग प्रक्रिया थांबविण्यात येईल, असे जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्याने बदली प्रक्रियेला ब्रेक लागला. मागील अनेक दिवसांपासून शिक्षक बदली प्रक्रिया रखडली होती. डिसेंबर महिन्याच्या शेवटी अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आक्षेप नोंदवून जानेवारी महिन्यात अंतिम यादी जाहीर झाली. शिक्षण विभागाने बदलीसाठी मंगळवारपासून कौन्सिलिंग केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात मंगळवारी कौन्सिलिंगसाठी शिक्षकांची गर्दी झाली होती. सकाळी 11 वाजल्यापासून बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षकांचे कौन्सिलिंग पूर्ण होऊन त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आली. दुपारनंतर इतर शिक्षकांचे कौन्सिलिंग होणार होते. परंतु तत्पूर्वी राज्य शिक्षण विभागाने तांत्रिक कारणाने कौन्सिलिंग थांबविण्यात आल्याचे जाहीर केले. यामुळे पुढील आदेश येईपर्यंत बदली प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.
तांत्रिक कारणाने कौन्सिलिंग थांबविले
मंगळवारी कौन्सिलिंग सुरू झाले. परंतु दुपारी राज्य शिक्षण विभागाने कौन्सिलिंग थांबविण्याचे आदेश दिले. तसेच दिलेली नियुक्तीपत्रेही मागे घेण्याचे सांगितले आहे. त्यानुसार बदली प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात आल्याची माहिती जिल्हाशिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात दिली.