जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन : उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
संपूर्ण राज्यामध्ये असलेल्या विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये गेली अनेक वर्षे काम करणाऱया शिक्षकांनी वेतन सुरू करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा देण्यात आला आहे. आमरण उपोषणामुळे तीन शिक्षक अत्यवस्थ झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
विनाअनुदानित शाळांमध्ये गेली 26 वर्षे आम्ही काम करत आहे. आम्हाला अजून वेतन सुरू करण्यात आले नाही. काही शिक्षक निवृत्त होत आहेत. ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे. एकीकडे सरकारी कर्मचाऱयांच्या पगारामध्ये दुपटीने वाढ करायची आणि काही जणांना उपाशी ठेवायचे, हा कोणता न्याय, असे म्हणत शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाबरोबरच धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे.
भरउन्हामध्ये हे शिक्षक आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाहीत. विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर यांनी गुरुवारी त्याठिकाणी भेट देऊन आश्वासन दिले आहे. मात्र केवळ आश्वासन देऊन आम्हाला न्याय मिळणार नाही, ठोस निर्णय द्या, तेव्हाच आंदोलन मागे घेऊ, असा इशारा देण्यात आला आहे. माजी शिक्षणमंत्री नागेश यांनी टप्प्याटप्प्याने सर्वांना वेतन सुरू करू, असे सांगितले होते. मात्र त्यांनी आतापर्यंत शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
कोरोना आणि पुरामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे सध्या वेतन देता येत नाही. मात्र भविष्यात वेतन देऊ, असे आश्वासन दिले आहे. अशाप्रकारे मनधरणी केली जात आहे. मात्र इतर कर्मचाऱयांना अमाप वेतन दिले जात आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. काहींना 1 लाख पगार तर विनाअनुदानित असलेल्यांना 10 हजार पगार हा कुठला न्याय? असा प्रश्नदेखील यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱयांमधील शिक्षक मंजेगौडा (हासन), अरुण बिरादार (मुधोळ), शंकर हिरेमठ (मुधोळ) हे अत्यवस्थ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारीही आंदोलन सुरूच ठेवण्यात आले होते. यावेळी कर्नाटक राज्य विनाअनुदानित शिक्षक नोकर संघाचे राज्याध्यक्ष जे. सी. शिवाप्पा, डी. बी. नदाफ, एस. एस. मठद, राजू गुंगवाड, मारुती अजानी, अशोक अन्निगेरी, एम. ए. कुरीशेट्टी, जे. सी. धनाई, विजय हासन, वीणा हिरेमठ, पी. पी. बेळगावकर, प्रा. सुरेश कांबळे यांच्यासह शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.