अचानक विद्युतदाब वाढल्याने ट्रान्स्फॉर्मर झाला होता निकामी
प्रतिनिधी /बेळगाव
सतत नादुरुस्त होत असलेला अनगोळ झेरे गल्लीतील ट्रान्स्फॉर्मर अखेर हेस्कॉमने बदलला असून दुसरा अधिक क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर बसवला आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी सातत्याने मागणी केली होती. हा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांत अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना अनगोळ झेरे गल्ली, कोनवाळ, आंबेडकरनगर व परिसरात घडली होती. याबाबत गोवावेस हेस्कॉमने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेऊन हेस्कॉमने तातडीने 15 ऑगस्ट रोजी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत केला.
या ट्रान्स्फॉर्मरवर अनगोळ येथील झेरे गल्ली, कोनवाळ, आंबेडकरनगर व कनकदासनगर व इतर भागातील भार यावर आहे. जुन्या ट्रान्स्फॉर्मरची क्षमता कमी असल्याने वारंवार खराब होऊन वीजपुरवठा खंडित होत होता. कधी कधी दिवसभर सिंगल फेज वीजपुरवठा होत होता. याची दखल घेऊन हेस्कॉमने दुसरा ट्रान्स्फॉर्मर बसवला व विद्युतपुरवठा सुरळीत केला आहे.
‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
‘विजेचा दाब वाढल्याने घरातील उपकरणे निकामी’ या मथळय़ाखाली सोमवारी 15 ऑगस्ट रोजी ‘तरुण भारत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन ट्रान्स्फॉर्मर बदल करून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे अनगोळ झेरे गल्ली परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.