जिल्हय़ातील 16,765 लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द : लाभार्थ्यांवर होणार दंडाची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
आर्थिकदृष्टय़ा सक्षम असूनदेखील बेकायदेशीर बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्ड मिळविलेल्या लाभार्थ्यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याने दणका दिला आहे. जिल्हय़ातील 16 हजार 765 बेकायदेशीर लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता बेकायदेशीर रेशनकार्ड मिळविणाऱयांना चाप बसला आहे.
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकौंटंट, आयकर भरणारी व्यक्ती, चारचाकी वाहने असणारे, शासकीय नोकरदार आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या खोटी कागदपत्रे देऊन बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्ड मिळविली होती. अशांवर अन्न व नागरीपुरवठा खात्याने कारवाई केली आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम असूनदेखील रेशनचा तांदूळ आणि इतर साहित्याचा लाभ घेणाऱया कुटुंबावर ही कारवाई झाली आहे.
राज्यातील 3 लाख 22 हजार लाभार्थ्यांची रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. त्यापैकी बेळगाव जिल्हय़ातील 16 हजार 765 लाभार्थ्यांचा समावेश आहे. गोरगरबांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून रेशनपुरवठा केला जातो. मात्र, यामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली असलेले नागरिकदेखील लाभ घेत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, अशा व्यक्तींनी अन्नभाग्य योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून अन्नभाग्य योजनेचा लाभ घेणे सुरूच होते. अशा बेकायदेशीर लाभार्थ्यांवर खात्याने कारवाई करून त्यांची रेशनकार्डे बंद केली आहेत.
35 रुपये किलोप्रमाणे दंड वसुली
वाहनधारकांच्या जोडलेल्या आधारकार्डच्या लिंकवरून 12 हजार 548 लाभार्थी बेकायदेशीर रेशनचा लाभ घेत असल्याचे आढळून आले होते. याबाबत परिवहन विभागाशी संपर्क साधून वाहने खरेदी आणि नोंदणीची माहिती मिळविण्यात आली होती. अशा लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय त्यांना दंडदेखील करून 35 रुपये किलोप्रमाणे वसुली केली जाणार आहे, अशी माहितीही मिळाली आहे.
सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, वकील, डॉक्टर, हॉटेलमालक यासह ग्रामीण भागात तीन एकरपेक्षा जास्त जमीन आणि शहरात एक हजार चौरस फुटापेक्षा अधिक मोठे घर असलेल्यांना आणि वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारपेक्षा अधिक असलेल्या नागरिकांना बीपीएल आणि अंत्योदय कार्ड मिळत नाही. मात्र, खोटी कागदपत्रे आणि एजंटांकरवी अशा नागरिकांनी बीपीएल आणि अंत्योदय कार्डे मिळविली आहेत. अशा लाभार्थ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे.