कीव्ह
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारतासह जर्मनी, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे आणि हंगेरीमधील युक्रेन च्या राजदूतांना हटवण्याची घोषणा शनिवारी रात्री केली. या बडतर्फीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या राजदूतांना हटवण्यामागे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. तसेच सध्या या अधिकाऱयांवर अन्य कोणती जबाबदारी दिली जाणार आहे काय, यासंबंधीही स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा उघडपणे विरोध न करणाऱया देशांपैकी भारत एक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत रशियाविरोधात मांडलेल्या ठरावावरील मतदानात भारताने भाग घेतला नव्हता.