वार्ताहर/ पुसेगाव
विसापूर (ता. खटाव) येथील एका वयोवृध्द दाम्पत्यांचा अज्ञात कारणावरुन खून केल्याची घटना घडली आहे. हणमंत भाऊ निकम (वय 68) व कमल हणमंत निकम (वय 65) असे पती-पत्नीचे नाव आहे. विसापूरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, अज्ञाताविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डबल मर्डर झाल्याने या भागात भीती निर्माण झाली आहे.
शनिवारी रात्री सुमारे आठच्या आसपास ही घटना उघड झाली. घटनास्थळी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सपोनि संदीप शितोळे यांनी भेट देऊन या घटनेमागील कारणमिमांसा जाणून घेतली. याबाबत घराशेजारी राहणाऱया सौ. अर्चना सुभाष शिंदे यांनी दिली फिर्याद दिली आहे.
पुसेगाव पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दि. 8 रोजी हणमंत निकम व कमल निकम हे दोघेही दैनंदिन कामकाज करत होते. शनिवार दि. 9 रोजी संपुर्ण दिवसभर निकम दाम्पत्याची कोणतीच हालचाल दिसून आली नाही. म्हणून हणमंत निकम यांच्या शेजारी राहणाऱया त्यांच्या नातेवाईक उषा जगन्नाथ सावंत यांनी फिर्यादी सौ. अर्चना यांना बोलावून हणमंत निकम यांच्या घराच्या दरवाजांना बाहेरून कडी लावलेली दिसत आहे. तसेच घरातील संपुर्ण लाईट बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर कमल निकम यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांच्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या स्नुषा विशाखा किरण निकम यांच्याशी मोबाईल फोनवरुन संपर्क साधून घराचे दरवाजे बंद आहेत. तुमचे सासू-सासरे कोठे गेले आहेत अशी चौकशी केली. त्यांच्या स्नुषा विशाखा निकम यांनी त्यांच्या सासू-सासऱयांच्या मोबाईलवर फोन केला. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही असे सांगून तुम्हीच दरवाजा काढून आमचे सासू-सासरे घरात आहेत का ते पहा असे सांगितले. त्यानंतर निकम यांच्या घराची कडी काढून घरातील प्रथम लाईट सुरु केली. त्यावेळी कमल निकम या जमिनीवर अंथरलेल्या जानवर पडलेल्या अवस्थेत होत्या. तर हणमंत निकम हे सुध्दा बेडवर पालथे पडलेले दिसले. दोघांच्या नाकातून रक्तस्त्राव आल्याचे दिसत होते. तसेच त्यांची कोणतीच हालचाल होत नसल्याने दोघेही मरण पावल्याचे दिसून आले. कमल निकम यांच्या अंगावरील नेहमी असणाऱया सोन्यांच्या दागिन्यांपैकी केवळ मंगळसूत्र गळ्यात दिसून आले, अशी फिर्याद अर्चना सुभाष शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, मयत दाम्पत्याची दोन मुले आपल्या पत्नी मुलासह तसेच एका मयत मुलाची पत्नी आपल्या मुलाबाळासह मुंबईत राहतात. बुधवार, गुरुवारी दोन दिवस मयत कमल निकम यांची बहीण जयश्री व मेहुणा (नाव माहीत नाही) हे विसापूर येथे निकम यांच्या घरी वास्तव्यास होते. त्यानंतर ते पुण्याला नातेवाईकांकडे गेले असे शुक्रवारी मयत कमल निकम यांनी फिर्यादी सौ अर्चना शिंदे यांना सांगितले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी त्या वयोवृद्ध दाम्पत्याचा खून झाला आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप समजले नाही.