प्रतिनिधी / बेळगाव
संगीत कलाकार संघ शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात वर्धापनदिन साजरा करत आहे. हा कार्यक्रम तीन सत्रांमध्ये होईल. स्वरमल्हार फौंडेशनच्या सहकार्याने कार्यक्रमाला शनिवारी संध्याकाळी 5.30 वा. सुरुवात होईल. ज्येष्ठ तबलावादक आणि गुरु पं. बंडोपंत उर्फ जी. ए. कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. शनिवारी इचलकरंजीचे युवा हार्मोनियम वादक त्रिगुण पुजारी संगीत पुष्प गुंफणार आहेत. डीकेटीईमध्ये डिप्लोमा शेवटच्या वर्षात शिकत असून वादनामध्ये मध्यमा पास आहेत. त्यांनी पं. बाळकृष्णबुवा संगीत मंडळातून प्रारंभिक तर बेळगावचे सारंग कुलकर्णी यांच्याकडे प्रगत शिक्षण सुरू आहे. त्यांना तबला साथ राहुल मंडोळकर देणार आहेत.
दुसरे पुष्प मूळचे वेंगुर्ला व मुंबईचे ज्येष्ठ गायक पं. राजाराम अंबर्डेकर गुंफणार आहेत. त्यांनी गायन आणि तबल्याचे शिक्षण वडिलांकडून घेतले. पं. मुरली मनोहर शुक्ल, उस्ताद गुलाम मुस्तफा खान आणि पं. भीमसेन जोशी यांच्याकडून प्रगत शिक्षण घेतले. गुरुकुल पद्धतीने पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून सहा वर्षे मार्गदर्शन मिळविले. अंगद यांनी आपले वडील गुरुदत्त यांच्याकडून तबला वादनाला सुरुवात केली. बंडोपंत कुलकर्णी व त्यांचे चिरंजीव संतोष यांच्याकडे स्वतंत्र वादनाचे तर रायबागचे कल्याण देशपांडे यांच्याकडून तबला वादनाचे शिक्षण घेत आहेत. बी. ई. पदवीधर अंगद हे संगीत विशारद आहेत.
सारंग यांनी आई गायिका रोहिणी कुलकर्णी यांच्याकडून प्रारंभिक गायनाचे शिक्षण घेतले. वडील संवादिनी वादक डॉ. सुधांशू कुलकर्णी यांच्याकडून स्वतंत्र वादनाचे तंत्र विकसित केले. स्वतंत्र वादन आणि सुधांशू यांच्याबरोबर युगल वादन हे त्यांचे विशेष आहे. एमबीएसहित संगीतामध्ये बी. ए. आणि संगीत विशारद आहेत. रविवारी योगेश रामदास, मुकुंद गोरे यांचे गायन, राहुल मंडोळकर यांचे तबला वादन आणि डॉ. स्नेहा राजुरीकर यांचे गायन होणार आहे. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे कळविण्यात आले आहे.