ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मागील आठवडय़ात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व्यक्तीची अटक बेकायदेशीर असल्याचे लोक अभिरक्षक कार्यालयाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दाखल गुन्ह्यातआरोपीला अटक करताना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे निरीक्षण नोंदवत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांनी आरोपीला जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
प्रशांत पाटील (वय 24) असे संबंधित संशयित आरोपीचे नाव आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे.
मागील आठवडय़ात छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी भुजबळ यांच्यासमवेत असणारे संतोष गायकवाड यांच्या मोबाईलवर फोन आला. मी प्रशांत पाटील बोलतोय. मला भुजबळांना मारायची सुपारी मिळाली आहे. मी उद्या त्यांना मारणार, आपण सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगतोय. सुपारी कोणी दिली असं विचारलं असता, दिली अशीच कोणीतरी, असं म्हणतं धमकी देणाऱ्याने फोन कट केला होता. त्यानंतर भुजबळ यांच्या वतीने पुणे पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. पुणे पोलिसांनी तातडीने फोन नंबर टेस करत धमकी देणाऱ्या प्रशांत पाटीलला कोकणातून अटक केली होती. प्रशांत पाटील याने दारुच्या नशेत भुजबळांना फोन केल्याची माहिती समोर आली होती.