ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे 18 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला उपस्थित राहणार आहोत.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ही एनडीएत सामील झाली आहे. 2 जुलै रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकूण 9 मंत्र्यांनी युती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थ खातंही आहे. तर त्यांच्यासोबतच्या 8 आमदारांना सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास, क्रीडा, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण, मदत आणि पुनर्वसन अशी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. एनडीएत सामील झाल्यामुळे अजित पवार आणि पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत.
यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, मंगळवारी (18 जुलै) मी आणि प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकीला जाणार आहोत. त्यावेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो होतो, त्यावेळी त्यांनाही राज्यातील पावसाची सद्यस्थिती सांगितली होती. यावेळी मोदींना भेटून राज्यातील कमी पावसाची परिस्थिती कानावर घालणार आहे, असेही ते म्हणाले.